ईडी अधिकारी म्हणाला, “तुझ्यावर इतकी कलमे जोडेन की राहुल गांधी पंतप्रधान झाल्यावरही…”

0

मुंबई,दि.14: मनोज परमार आणि त्यांची पत्नी नेहा यांचे मृतदेह सिहोर जिल्ह्यातील आष्टा येथे त्यांच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण आहे. 5 डिसेंबर रोजीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आष्टा आणि इंदूरमधील मनोज परमारच्या घरांवर छापे टाकले होते. मनोज परमार हे मध्य प्रदेशच्या सिहोरमधील काँग्रेस समर्थक उद्योजक होते. 

ईडी कारवाईच्या दबावातून परमार दाम्पत्याने जीवन संपवले. अनेक स्थावर आणि जंगम मालमत्तांची कागदपत्रेही जप्त करण्यात आली. काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’मध्ये त्यांच्या मुलांच्या टीमने राहुल गांधींना पिगी बँक भेट दिल्यावर मनोज परमार चर्चेत आले होते. परमार यांची सुसाईड नोट आढळली आहे. त्यात ‘भाजपात असता तर केसच झाली नसती, असे ईडी अधिकारी मला म्हणाला आणि तुझ्यावर इतकी कलमे जोडेन की राहुल गांधी पंतप्रधान झाल्यावरही ती हटवू शकणार नाहीत’, असे धमकवल्याचे नमूद केले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

मनोज आणि त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ‘X’ वर लिहिले, “मी मनोजसाठी वकिलाची व्यवस्थाही केली होती. पण अत्यंत दुःखाने सांगावे लागते की मनोज इतका घाबरला होता की आज सकाळी त्याने आणि त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. मी या प्रकरणाची ईडी संचालकांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी करतो.

भाजपा आणि ईडीवर गंभीर आरोप 

पोलिसांना घटनास्थळी पाच पानी सुसाईड नोट सापडली. त्यात परमार यांनी ईडीचे अधिकारी आणि भाजपच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रचंड छळ केला. शिवीगाळ आणि मारहाण केली. राहुल गांधींविरुद्ध व्हिडीओ बनवण्यासाठी धमकी दिली, असे गंभीर आरोप परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत केले आहेत. ईडीबरोबर भाजपच्या लोकांनी छळ केल्यामुळेच आई-वडिलांनी आत्महत्या केल्याचा दावा परमार यांच्या मुलांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here