अंतरवाली सराटी,दि.31: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. अंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांनी बैठक घेतली. बैठकीनंतर मराठा, दलित अन् मुस्लिम यांचे समीकरण जुळले आहे. आता सत्ता परिवर्तन होणार, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली. त्यांनी लाडकी बहीण योजनेचे नाव न घेता सरकारवर टीका केली. जरांगे यांच्या घोषणेनंतर विधानसभेत समीकरणं बदलण्याचा दावा करण्यात येत आहे. बैठकीस मुस्लिम, दलित समाजातील धर्मगुरू आणि नेत्यांची उपस्थिती होती
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
3 तारखेला आम्ही उमेदवार आणि मतदारसंघ सांगणार आहोत. कोणत्या जागी कोणता उमेदवार हे ठरले जाईल. एक उमेदवार निवडला जाईल. 4 तारखेला अर्ज मागे घेण्यात येईल. आमची सहन करण्याची क्षमता संपली आता परिवर्तन होणार, गोरगरिबांच्या लेकराला न्याय देणारी ही लाट आहे,असे जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाजाला मी एकत्र केले आहे. आता मुस्लिम आणि दलित समाज देखील सोबत आला आहे. यामुळे समीकरण जुळले आहे. आम्ही सोबत आल्याने बदल घडेल असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचे नाव न घेता सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही 1500 रुपये देऊन नादी लावत आहोत का? आता परिवर्तन होणार. सहन करण्याची क्षमता संपली. सुपडा साफ करणार म्हणजे करणार. सोडणार नाही. चिन्ह मिळाल्यावर आम्ही बोलू, असे ते म्हणाले.