परभणी,दि.4: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीत निषेध मूक मोर्चा काढण्यात आला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची नार्को टेस्ट करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. तसंच आरोपींना मदत करणाऱ्यांनाही अटक करावी असंही म्हटलं आहे. सरपंच संतोष देशमुख प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मीक कराडला अटक करण्यात आलेली आहे.
वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. कराडला अटक झाल्यानंतर आता या प्रकरणाच्या तपासाबाबत आणि दबावाबाबत संशय व्यक्त होत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी थेट मंत्री धनजंय मुंडे यांना थेट इशारा दिला आहे.
पोलीस ठाण्यात गेल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याचा उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे. यापुढे जर देशमुख कुटुंबीयांना धक्का लागला, तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
काय म्हणाले मनोज जरांगे?
धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबीयांना जर धक्का बसला तर घरात घुसून मारू असा शेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही, देशमुख कुटुंबीयांना जर त्रास झाला तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असाही इशाराही त्यांनी दिला. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील दोषींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी मनोज जरांगे यांनी हा इशारा दिला आहे.