रत्नागिरी,दि.२५: लाच प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मनीष कांबळे यांना अटक करण्यात आली आहे. सावर्डे पोलिस ठाण्यात ते कार्यरत आहेत. अपघातात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला विमा रक्कम मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्यासाठी 25 हजारांची लाच मागितली होती. विम्याचा दावा करण्यासाठी पोलिसांकडून आरटीओ तपासणी अहवाल आणि डीएआर (Detailed Accident Report) आवश्यक होता.
मुंबई-गोवा महामार्गावर अपघाती मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबीयांना विम्याचा दावा मिळवण्यासाठी आरटीओ तपासणी अहवाल आणि डीएआर फॉर्म हवे होते. कांबळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. कांबळे यांच्या वतीने लाच घेणाऱ्या अभिजीत शिर्के याला एसीबीने ताब्यात घेतले आहे.
PSI कांबळे यांनी 25 हजारांची मागणी केली. तडजोडीनंतर 15 हजार रुपये देण्याचे ठरले. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील पोलीस उपनिरीक्षकच्या सांगण्यावरून त्यांच्या सहकाऱ्याला 15000 रुपयाची लाच घेताना रंगेहात सापडल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
मनिष कांबळे यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारदारांनी खाजगी इसम अभिजित प्रकाश शिर्के यांचे चिपळूण पोलीस स्टेशन जवळ असलेल्या सोमेश्वर जनरल स्टोअर्स या दुकानात जावून त्यांची भेट घेतली. त्यावेळी खाजगी इसम शिर्के यांनी त्यांच्या फोनद्वारे मनिष कांबळे यांना संपर्क साधला. त्यांचे दोघात बोलणे झाल्यानंतर अभिजित शिर्के यांनी तक्रारदार यांच्याकडे फोन दिला. यावेळी मनिष कांबळे यांनी लाच रक्कम अभिजित शिर्के यांच्याकडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी लाच रक्कम 15 हजार रुपये ही खाजगी इसम यांच्याकडे पंचासमक्ष दिली.








