जीएसटीची ११.८० कोटींची फसवणूक करणाऱ्यास अटक

0

मुंबई,दि.६: महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (जीएसटी) विभागाने विशेष मोहिमेअंतर्गत मे. ढोलकिया एन्टरप्राइजेस; जीएसटी क्रमांक २७AMBPD१५६३G१ZG या कंपनीचे प्रोप्रायटर इब्राहिम असलम ढोलकिया यांना २४ सप्टेंबर २०२५ रोजी अटक केली असल्याचे माझगांव येथील राज्यकर उपआयुक्त (जनसंपर्क) जनार्दन आटपाडकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

मे. ढोलकिया एन्टरप्राइजेस या व्यावसायिकाविरोधात विभागातर्फे कारवाई सुरु करण्यात आली होती. कारवाई दरम्यान सदर व्यापाऱ्याने चुकीची कर वजावट व बनावट बिजके (इनव्हॉइस) जारी करून ११.८० कोटींची महसूल हानी केल्याचे निदर्शनास आले.

अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी, मुंबई यांनी आरोपी इब्राहिम असलम ढोलकिया यांस ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई अन्वेषण-ब चे राज्यकर सहआयुक्त संजय पवार व राज्यकर उपआयुक्त मंजिरी फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कर सहायक आयुक्त उमेश ब. कांबळे, प्रशांत ना. बारवे, मनीषा क्षीरसागर व राज्य कर निरीक्षक, अन्वेषण-ब, मुंबई यांनी राबवली.

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभाग सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण संसाधनांचा वापर करुन आणि इतर विभागांशी समन्वय साधून कर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे. वित्तीय वर्ष २०२५-२६ मधील ही २९ वी अटक आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here