दीपक केसरकर यांच्या शरद पवारांवरील आरोपानंतर राष्ट्रवादीचे सणसणीत प्रत्युत्तर

0

मुंबई,दि.13: दीपक केसरकर यांच्या शरद पवारांवरील आरोपानंतर राष्ट्रवादीने सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी दीपक केसरकर यांना शरद पवारांवर केलेल्या आरोपवर प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला होता.

शिवसेनेतून नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे यांना बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली असा दावा दीपक केसरकरांनी केला. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

“बेकायदेशीर शिंदे सरकारचे बेकायदेशीर प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शरद पवारांबद्दल केलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. बेकायदेशीर शिंदे सरकारचे बेकायदेशीर प्रवक्ते काहीही बोलतात. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर लोटांगण घालणाऱ्या बंडखोर आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वेदना देण्याची खरी कृती केली आहे”, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दीपक केसरकर यांना शरद पवारांवर केलेल्या आरोपवर प्रत्युत्तर दिले.

“शरद पवारांनी बाळासाहेबांचा स्वाभिमान आणि मैत्री जपण्याचे काम केले. शिवसेनेचा इतिहास किंवा जे लोक बाहेर पडले त्याची कारणे दिपक केसरकर यांना माहीत नसावीत. पण बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत होती. जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला झिडकारले त्यावेळी शरद पवारांनी शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षाची मोट बांधून महाविकास आघाडी तयार केली व शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले हे दिपक केसरकर सोयीस्करपणे विसरले आहेत”, अशा शब्दांत त्यांनी केसरकरांना सुनावले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here