महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ ची दिली हाक

0

दि.६ :उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. ११ ऑक्टोबर रोजी या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यव्यापी बंद पाळावा, असे आवाहन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही लखीमपूर खेरी घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी पाटील यांनी लखीमपूर घटनेचा निषेध करत महाराष्ट्र बंदची घोषणा केली. भाजपचं सरकार शेतकऱ्यांशी क्रूरपणे वागत आहे. त्यांचे आंदोलन चिरडत आहे. लखीमपूर घटनेतील आरोपींना अटकही करण्यात आली नाही. याचा आज मंत्रिमंडळात निषेध करण्यात आला व जे हुतात्मा झाले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, असे पाटील यांनी सांगितले.

शिवसेनेची भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली. शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठिशी राहिलेली आहे. लखीमपूरची घटना निषेधार्ह असून त्याविरोधात पाळण्यात येत असलेल्या बंदमध्ये शिवसेना सहभागी होत आहे, असे शिंदे यांनी सांगितले. भाजपचं सरकार जनरल डायरप्रमाणे वागत आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडणाऱ्या भाजपचा खरा चेहरा दिसला आहे, अशी तोफ डागत बाळासाहेब थोरात यांनीही काँग्रेस बंदमध्ये उतरणार असल्याचे सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here