सोलापूर,दि.२: सोलापूर शहरवासियांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या महात्मा बसवेश्वर लिग (Mahatma Basweshwar Premier League) अर्थात ‘एमबीपीएल-२०२२’ (MBPL) साठी खेळाडूंची निवड प्रक्रिया रविवारी (ता.३ एप्रिल) रोजी होणार आहे. या लिलाव पध्दतीने होणाऱ्या बोलीकडे सर्व खेळाडूंचे लक्ष लागले आहे.
वीरशैव समाजातील खेळाडूंचा सहभाग असणारी ही स्पर्धा सोलापुरातील भवानी पेठेतील जयभवानी मैदानावर २२ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी क्रीडा समिती नियुक्त करण्यात आली असून, याची धुरा अध्यक्ष सचिन कुलकर्णी, उपाध्यक्ष परमेश्वर माळगे खजिनदार गुंडुराज गुळगोंडा आणि कार्याध्यक्ष रवी बिराजदार यांच्याकडे आहे. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे १ लाख ४८९ रुपयांचे पारितोषिक नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांच्याकडून तर द्वितीय क्रमांकाचे ५१ हजार ४८९ रुपयांचे पारितोषिक अविनाश पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे.
दरम्यान, या स्पर्धेत २० संघ असून संघ मालक म्हणून शहरातील उद्योजक, व्यापारी, सामाजिक संस्था आणि राजकीय क्षेत्रातील मंडळी सहभागी झाले आहेत. या स्पर्धेसाठी संघासाठी खेळाडूंची निवड प्रक्रिया लिलाव (ऑक्शन) पद्धतीने रविवारी (ता. ३ एप्रिल) सायंकाळी ४ वाजता सुरू होणार आहे. याचे थेट प्रक्षेपण यू-ट्युबद्वारे करण्यात येणार आहे. यातून कोणत्या खेळाडूंसाठी कितीची बोली लागणार? कोण टॉपवर राहणार? याकडे सर्व समाज बांधवांसह खेळाडूंचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रत्यक्ष स्पर्धा २२ एप्रिलपासून सुरू होणार असून सर्व सामने यू ट्यूब वर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे, १ मे रोजी अंतिम सामना रंगणार आहे. त्याचदिवशी सायंकाळी समाजातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे.