Sushma Andhare: सुषमा अंधारे म्हणाल्या ‘देवेंद्र फडणवीस यांना धक्का लागला तरी…’

0

मुंबई,दि.७: शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सूचक विधान केलं आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल १५ मे पूर्वी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ११ ते १३ मे च्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना धक्का लागला, तरी आश्चर्य वाटू नये, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

११ ते १३ मे दरम्यान बरचसे चित्र स्पष्ट झालेलं असेल | Sushma Andhare

“एकनाथ शिंदे अचानक राज्यपालांना भेटायला जाणं, गुजरातमधील वर्तमानपत्रात बातमी येणं किंवा दिल्लीश्वरांनी तातडीने बोलावणं, आतापर्यंत कधीही पाहिलं नव्हतं. मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसांची रजा घेतली. या तीन दिवसांमध्ये सलग पूजा होती म्हणे… पूजा वगैरे कशासाठी होत आहेत, याचा अर्थ लावा… पण, ११ ते १३ मे दरम्यान बरचसे चित्र स्पष्ट झालेलं असेल,” असं सुषमा अंधारेंनी सांगितलं.

फडणवीसांच्या सर्व उठाठेवीमुळे पक्षाची प्रतिमा खराब झाली | Sushma Andhare On Devendra Fadnavis

“देवेंद्र फडणवीसांनी जिवाचा आटापिटा केला असून, पुन्हा येण्यासाठी आताही करत आहेत. पण, दिल्लीश्वरांनी त्यांना तंबी दिली आहे. आता बास… कारण, फडणवीसांच्या सर्व उठाठेवीमुळे पक्षाची प्रतिमा खराब झाली आहे. विधानपरिषद निवडणूक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत तर ‘बाजार’च उठला आहे,” असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला आहे.

“येणाऱ्या काळात शिंदेंचा हात धरणे कितपत आपल्याला हिताचे ठरेल, याबद्दल भाजपालाच शंका आहे. त्यामुळे ११ ते १३ मे च्या काळात निश्चितपणे देवेंद्र फडणवीसांना धक्का लागला, तरीसुद्धा आश्चर्य वाटू नये,” असेही सुषमा अंधारेंनी म्हटलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here