आमदारांकडे कॅबिनेट मंत्रीपदासाठी 100 कोटी रुपयांची मागणी, 4 जणांना अटक

0

मुंबई,दि.20: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघेच सध्या महाराष्ट्रात अनेक निर्णय घेत आहेत. मंत्रिमंडळाची बैठक ही या दोन जणांचीच बैठक असते. राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजून करण्यात आला नाही. अनेकजण आपला समावेश मंत्रिमंडळात व्हावा म्हणून इच्छुक आहेत. त्यातही कॅबिनेट मंत्रीपद मिळावे म्हणून अनेकजण प्रयत्न करताना दिसत आहेत.

राज्यात नवे सरकार स्थापन झाले असून, नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाचे नाव येणार, कोणाला मंत्रीपद मिळणार? याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच एका राष्ट्रीय पक्षातील आमदाराला कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्याच्या नावाखाली चक्क 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने चार जणांना अटक केली आहे.

राज्यातील नव्या सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मंत्रीपद मिळवण्यासाठी अनेक आमदार नंदनवन (एकनाथ शिंदे यांचा बंगला) आणि सागर (देवेंद्र फडणवीस यांचा बंगला) या ठिकाणी फेऱ्या मारताना दिसत आहेत. याचा फायदा घेत चार जणांनी मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली चक्क 3 आमदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.

इतकेच नाही तर आरोपींनी आधी आमदारांना फोन करून आपण दिल्लीहून आल्याचे सांगितले. तसेच मोठ्या मंत्रींनी त्यांचा बायोडेटा विचारला आहे, असेही सांगितले. यानंतर संबंधित आरोपींनी आमदारांशी दोन ते तीन वेळा फोनवर बोलून सांगितले की, मंत्रिमंडळात मंत्रिपद हवे असेल तर 100 कोटी रुपये द्यावे लागतील, सुत्रांच्या माहितीनुसार, हे आरोपी एका बड्या नेत्याच्या संपर्कात असल्याचे समजते. फोनवरील संभाषणानंतर 17 जुलै रोजी आरोपींनी आमदारांची ओबेरॉय हॉटेलमध्ये भेट घेतली.

मंत्रिमंडळात स्थान हवे असेल तर 100 कोटी रुपये द्यावे लागतील, त्यापैकी 20 टक्के रक्कम आता द्यावी लागेल आणि उर्वरित मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर द्यावी लागेल, असे बैठकीत सांगण्यात आले. आरोपींनी सोमवारी आमदारांना नरिमन पॉइंटवर भेटण्यासाठी बोलावले, त्यानंतर आमदारांनी त्यांना पैसे घेण्यासाठी ओबेरॉय हॉटेलमध्ये नेले.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना याची माहिती मिळाली, त्यानंतर गुन्हे शाखेच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलने सापळा रचून एका आरोपीला पकडले आणि त्याच्या चौकशीत आणखी 3 आरोपींची नावे समोर आली, ज्यांना नंतर अटक करण्यात आली.

याप्रकरणी एका आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींची नावे रियाज अल्लाबक्ष शेख, योगेश मधुकर कुलकर्णी, सागर विकास संगवई, आणि जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हे आरोपी आणखी किती आमदारांच्या संपर्कात होते आणि किती जणांना पैसे दिले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here