Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होणार तर अजित पवार मुख्यमंत्री होणार?

0

मुंबई,दि.३: Maharashtra Politics: राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार काही आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होणार अशी दोन महिन्यांपासून सुरू असलेली चर्चा अखेर रविवारी खरी ठरली. राज्याच्या राजकारणात मागील साडेतीन वर्षांत तिसरा महाभूकंप झाला. अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीच्या अन्य ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा या घडामोडीवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच नजीकच्या काळात एकनाथ शिंदे अपात्र ठरतील आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. (Maharashtra Politics) 

अजित पवार उपमुख्यमंत्री तर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप हे पक्ष आपापल्या नेत्यांच्या बैठका घेणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, महाराष्ट्रात आता नवा मुख्यमंत्री होणार, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होणार | Maharashtra Politics

महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलण्यात येणार आहे. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल. एकनाथ शिंदे यांना हटवले जाईल. अपात्रतेच्या केसमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरतील. यामुळे इतक्या घाईगडबडीत अजित पवारांना सोबत घेतले आहे. त्यामुळे आता अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी आयाराम-गयाराम असे राजकारण सुरू केले आहे. मात्र, जनताच आता धडा शिकवेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच एकनाथ शिंदे गेले आणि आता अजित पवार गेले आहेत. हे सगळे राजकारण सीबीआय, इन्कम टॅक्स आणि ईडीच्या आडून खेळले जात आहे. आमच्या हातात दोन तास या सगळ्या संस्था द्या, आम्हीही राज्याचे आणि देशाचे राजकारण बदलून दाखवू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. 

दरम्यान, रविवारी सकाळी अजित पवार यांनी देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या निवडक आमदारांची बैठक बोलवली होती. जे सोबत येऊ शकतात, अशाच आमदारांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. तिथे सरकारला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली आणि पाठिंब्याचे पत्र तयार होऊन त्यावर उपस्थित आमदारांच्या सह्याही घेण्यात आल्या. ही बैठक सुरू होती तेव्हा सुप्रिया सुळे देवगिरीवर पोहोचल्या. अजित पवारांना समजवण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. मात्र, यश येत नसल्याने नाराज सुप्रिया बाहेर पडल्या. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here