बुलडाणा,दि.9: Maharashtra Politics News: एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेनाच्या 14-15 आमदारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बरोबर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी गेले आहेत. शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार गेले आहेत. ठाकरे गटातील नेते सातत्याने शिंदे गटावर टीकास्त्र सोडताना दिसतात. मात्र, आता नुकतंच शिंदे गटाच्या खासदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे. बुलडाणा जिल्हा दौऱ्यादरम्यान खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
उद्धव ठाकरे गटामध्ये राहिलेले 14-15 आमदार त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही आमदार रात्रीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात. यासोबतच मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. हे स्वतः मी पाहिलं असून आमच्या संपर्कात हे आमदार आहेत, असा दावा खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
शिंदे गटात प्रवेश करतील
सर्वच ठाकरे गटातील आमदार आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही आमदार अस्वस्थ आहेत. लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश हा शिंदे गटात होईल. आगामी निवडणूकीपूर्वी त्यांचा शिंदे गटात प्रवेश होईल, असा गौप्यस्फोट खासदार प्रतापराव जाधव यांनी केला असून खळबळ माजवून दिली आहे.
दरम्यान, सोयाबीनच्या भावामध्ये होणाऱ्या वाढीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. सोयाबीनसह तेलबियावरील निर्बंध केंद्र सरकारने उठवल्यामुळे सोयाबीनच्या भावामध्ये वाढ होत आहे. त्याचा फायदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे, अशी माहिती प्रतापराव जाधव यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे यासंदर्भात त्यांनी पत्रव्यवहार करत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.