चंद्रशेखर बावनकुळे यांचे राज ठाकरेंबाबत सूचक वक्तव्य

राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहेच: चंद्रशेखर बावनकुळे

0

नाशिक,दि.१२: भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबाबत (Raj Thackeray) सूचक वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहेच, त्यांचा भाजपवर आणखी विश्वास वाढेल, आमचे दार खुलेच आहे, असे सूचक वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी येथे केले. भाजपमध्ये गद्दारांना नव्हे तर, इमानदारांना थारा आहे.राज ठाकरे हे प्रगल्भ नेते असून खुलेपणाने बोलतात. मनात एक आणि ओठावर एक असे त्यांचे नसते, असे कौतुकही त्यांनी केले.

२०० हून अधिक जागा जिंकू: चंद्रशेखर बावनकुळे

भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी बैठकीतून मिळालेल्या ऊर्जेचा उपयोग बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर ताकद उभी करण्यात होईल, असे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयातून २०० हून अधिक जागा जिंकू असा दावा त्यांनी केला.

अमरावतीत झालेल्या पराभवाचे चिंतन करण्याची गरज आहे. समाज माध्यमांचा गैरवापर केला जात आहे. काही लोकांनी पेड वॉररूम तयार केल्या आहेत. त्याला उत्तर देण्यासाठी १८ हजार कार्यकर्त्यांची फौज उभी करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

ठाकरे गटावर टीका

सावरकर यांच्यावर टीका केली जात असताना उद्धव ठाकरे गप्प होते. हिंदूुत्ववादी मते कधीही त्यांना मिळणार नाहीत. ठाकरे गट पुढील काळात ‘एमआयएम’शीही युती करेल, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here