दि.८: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर (NCB) केलेल्या आरोपांवर ठाम असून एनसीबीबाबत आणखी गौप्यस्फोट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईजवळ क्रूझवरील ड्रग्ज पार्टी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने उधळली होती. या कारवाईत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान व अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाईच फेक असल्याचा दावा केल्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आता नवा गौप्यस्फोट करणार आहेत. उद्या (शनिवारी) दुपारी १२ वाजता मलिक हे मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.
नवाब मलिक यांची पत्रकार परिषद शुक्रवारी होईल, असे आधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले होते. मात्र, मलिक यांनी नंतर ट्वीट करत ही पत्रकार परिषद शुक्रवार ऐवजी शनिवारी (९ ऑक्टोबर) होणार असल्याचे सांगितले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कारवायांबाबत मला आणखी पोलखोल करायची आहे. त्यासाठी मी माहिती गोळा करत असून थोडा आणखी वेळ लागणार आहे. म्हणून पत्रकार परिषद आता शनिवारी होईल, असे मलिक यांनी नमूद केले आहे. त्याआधी माध्यमांशी बोलताना मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर गंभीर आरोप केला.
पब्लिसिटीसाठी सेलिब्रिटींच्या अटका
महाराष्ट्राला, महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं तसेच बॉलीवूडमधील स्टार कलाकारांना लक्ष्य करून पूर्ण फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र एनसीबीला हाताशी धरून रचलं गेलं आहे. गेल्या एका वर्षात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, भारती सिंग, अर्जुन रामपाल, दीपिका पदुकोण, आर्यन खान यांच्यावर केलेली कारवाई केवळ पब्लिसिटीसाठी होती. याच्या मुळाशी गेल्यास धक्कादायक माहिती पुढे येऊ शकते.
याआडून खंडणीवसुलीचे काम केले जात आहे. मुंबईत फिल्म इंडस्ट्री आणि अन्य क्षेत्रातील बड्या व्यक्तींच्या मागे या यंत्रणा लावण्यात आल्या आहेत. त्यांना भीती घालण्यासाठी खासगी लोकांना हाताशी धरले गेले आहे. फ्रॉड आणि प्रायव्हेट डीटेक्टिव्ह असलेल्या व्यक्ती यात सामील आहेत. त्यांच्या माध्यमातून बदनामी करून लोकांना घाबरवून खंडणी वसुल केली जात आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. एनसीबीचं मुंबईतील नेटवर्क आणि खंडणीखोर यांनी संगनमताने चालवलेलं खंडणीचं रॅकेट मी उघड करणार आहे, असा इशाराही मलिक यांनी दिला.
#WATCH | It is NCB's conspiracy to defame Maharashtra government & film industry. Whether it was Rhea Chakraborty or Aryan Khan, they were arrested for publicity & it was forgery. We'll be exposing extortion nexus run by NCB: Maharashtra Minister Nawab Malik pic.twitter.com/I9DaDxsm7d
— ANI (@ANI) October 7, 2021
मनिष भानुशालीवर पुन्हा आरोप
मनीष भानुशाली हा भाजपचा हायप्रोफाइल नेता आहे. तो काही छोटा कार्यकर्ता नाही. भानुशालीचा पंतप्रधानांसोबत फोटो आहे. गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबतही त्याचे फोटो आहेत. अनेक केंद्रीय मंत्री, गुजरातमधील मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबतही हा भानुशाली वावरताना दिसतो आहे. अशा व्यक्तींचा या रॅकेटमध्ये सहभाग असून त्याचा पर्दाफाश मी करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.