महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात मोठी आश्वासने

0

मुंबई,दि.10: महाविकास आघाडीचा जाहीरनाम्यात मोठे आश्वासने देण्यात आली आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर जनतेला 25 लाख रुपयांचा विमा, वर्षाला 500 रुपयांत सहा गॅस, तसेच महालक्ष्मी योजनेतून महिलांना महिन्याला तीन हजार रुपये देणार असे आश्वासन महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. यावेळी खरगे यांनी महाविकास आघाडीच्या जाहीरनामा महाराष्ट्रनामातली आश्वासनं वाचून दाखवली.

100 युनिट वीज मोफत

महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर कंत्राटी भरती रद्द करणार असे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. तसेच ⁠300 युनिट वीज वापरणाऱ्यांना 100 युनिट वीज मोफत, दोन लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात, सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा 4 हजार मानधन, महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह इंडस्ट्री स्थापन करणार, एमपीएससी परीक्षांचे निकाल 45 दिवसांत लावणार, महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार, अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती सुरु करणार, बार्टी,महाज्योती,सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार, सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार, शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी,नियमित कर्जफेड करणाऱ्यास 50 हजारांची सूट, 2.5 लाख नोकरभरती, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती, जातीनिहाय जणगणना तसेच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार असे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here