मुंबई,दि.5: Maharashtra Lockdown News: देशात पुन्हा कोरोना (Covid -19) रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. अशातच ओमिक्रॉन (Omicron) रुग्णांचीही संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक राज्यात मिनी लॉकडाऊन (Mini Lockdown) लावण्यात आला आहे. राज्य सरकार बुधवारी मिनी लॉकडाऊनसारखे आणखी काही निर्बंध जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. त्या निर्णयांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना देतील व निर्बंध जारी केले जातील, असे सूत्रांनी सांगितले.
मंत्रिमंडळाची बुधवारी होणारी बैठक होणार नाही. उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित विभागांचे मंत्री, पोलीस, प्रशासन, टास्क फोर्स यांच्यासह बैठक घ्यावी, त्यात निर्बंधांचे स्वरुप निश्चित करावे व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे ठरले आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मंत्रालयात बैठक घेतली. केंद्राने राज्यांना लस, औषधांसह वाढीव निधीही दिला आहे. त्यामुळे राज्याने काम करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.
केंद्राने सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीबाबत निर्बंध जारी केले होते. तसाच निर्णय राज्यात घेतला जाऊ शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांची 50 टक्के उपस्थिती व अन्य कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवणे असा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो.