मुंबई,दि.११: Maharashtra Budget 2022: कोरोना संकटाशी तोंड देताना कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास , दळणवळण आणि उद्योग या विकासाच्या पंचसुत्रावर आधारित अर्थसंकल्प आज महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत सादर केला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. येत्या तीन वर्षांकरिता चार लाख कोटींची तरतूद करण्यात आली. यातून राज्यात भरीव गुंतवणूक होऊन राज्याचा जीडीपी एक लाख कोटी डाॅलर्सपर्यंत वाढेल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
तुळापूर येथे संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी २५० कोटीची तरतूद सरकारने केली आहे. आजच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची प्रोत्साहनपर मदत घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली. याचा २० लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. भूविकास बँकेच्या ३४७८८ शेतकऱ्यांची ९६४ कोटीची कर्जमाफी करण्याची घोषणा आज पवार यांनी केली. त्यामुळे या बँकेच्या शेतकऱ्यांना आज अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांची २७५ कोटींची थकीत देणी अदा केली आहेत.
एक ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल – अजित पवार
राज्यात राबवण्यात येणाऱ्या विकासाची पंचसूत्री या कार्यक्रमासाठी ४ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या कार्यक्रमानंतर राज्यातली गुंतवणूक वाढेल आणि एक ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल, असा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तसंच राज्यातल्या महापुरुषांच्या मूळ गावातील शाळांना १ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाईल.
आरोग्य सेवांवर येत्या ३ वर्षांत ११ हजार कोटी खर्च करणार
आरोग्य सेवांवर येत्या ३ वर्षांत ११ हजार कोटी खर्च करण्याचं सरकारचं नियोजन आहे. शासकीय ट्रॉमा केअर युनिट्स स्थापन करण्यासाठी १०० कोटी रुपये आणि आवर्ती खर्चासाठी १८ कोटींचा निधी. टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरला आयुर्वेदिक संशोधन केंद्रासाठी १० हेक्टर जमीन देण्यात येईल.
वैद्यकीय शिक्षणासाठी पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय
देशातल्या तरुणांना इथेच वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील सेंट जॉर्ज, नाशिकमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरमधील बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमात आधुनिक तंत्रात फिजिओथेरपी तंत्राचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.