Home अर्थकारण LPG Price Drop: सर्वसामान्यांना सुखद धक्का मिळण्याची शक्यता; गॅस सिलिंडरच्या दरात मोठी...

LPG Price Drop: सर्वसामान्यांना सुखद धक्का मिळण्याची शक्यता; गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात होणार?

0

नवी दिल्ली,दि.८: LPG Price Drop: वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले असतानाच आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. देशातील गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी घट होण्याची चिन्हे आहेत. ‘चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीज’ने (CTI) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एलपीजी (LPG) आणि पीएनजी (PNG) वरील कर रद्द करण्याची मागणी केली आहे. या मागणीवर मोहोर उमटल्यास घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किमती झपाट्याने खाली येतील.

महागाईच्या आगीत कर कपातीची फुंकर | LPG Price Drop

सध्या जागतिक पातळीवर इराण-अमेरिका युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. या जागतिक दरवाढीचा फटका भारतीय ग्राहकांना बसू नये, यासाठी CTI ने कराचा बोजा कमी करण्याचा उपाय सुचवला आहे. संघटनेच्या मते, अत्यावश्यक सेवांमधील गॅसला करमुक्त केल्यास सामान्यांच्या खिशाला मोठी मदत होईल.

कसा असेल किमतींवर परिणाम?

सध्याच्या कर रचनेनुसार घरगुती सिलिंडरवर ५ टक्के जीएसटी (GST) आकारला जातो. जर हा कर हटवला, तर सिलिंडरची किंमत अंदाजे ४३ रुपयांनी कमी होईल. तसेच, केंद्र सरकारने अलीकडेच वाढवलेले ६० रुपये मागे घेतल्यास, एकूण कपात १०० रुपयांपर्यंत जाऊ शकते. अशा स्थितीत ९१३ रुपयांचा घरगुती सिलिंडर साधारण ८०९ रुपयांना उपलब्ध होऊ शकतो.

व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही मोठी घसरण शक्य

व्यावसायिक वापराच्या सिलिंडरवर सध्या तब्बल १८ टक्के जीएसटी आकारला जातो. जर हा कर पूर्णपणे रद्द झाला, तर व्यावसायिक सिलिंडरचे दर थेट ३१७ रुपयांनी कोसळतील. याचा फायदा हॉटेल, खानावळी आणि लघु उद्योगांना मोठ्या प्रमाणावर मिळेल, ज्यामुळे बाहेरच्या जेवणाचे दरही कमी होण्याची शक्यता आहे.

पीएनजी धारकांसाठीही दिलासादायक मागणी

पाईप गॅस (PNG) वापरणाऱ्या ग्राहकांसाठीही CTI ने पुढाकार घेतला आहे. सध्या पीएनजी जीएसटीच्या कक्षेबाहेर असून त्यावर राज्य सरकारे व्हॅट (VAT) आकारतात. त्यामुळे या इंधनालाही जीएसटीच्या कक्षेत आणून किंवा करमुक्त करून किंमत कमी करण्याची विनंती पंतप्रधानांना करण्यात आली आहे.

मनमोहन सिंह यांच्या काळात ५०० रुपयांच्या आत असणारा गॅस आता हजार रुपयांच्या उंबरठ्यावर असल्याने, मोदी सरकार या प्रस्तावावर काय निर्णय घेते, याकडे आता देशातील गृहिणींचे आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.