कोलकता,दि.२: Lockdown Updates: देशात कोरोना बाधितांची संख्या (Corona Cases In India) वाढत आहे. अशातच देशात ओमिक्रॉन व्हेरीयंट (Omicron Variant) रुग्णांची संख्याही वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांना यापूर्वीच निर्देश दिले आहेत.
ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron Variant) एंट्रीमुळे येत्या काही दिवसांत रुग्णसंख्येचा उद्रेक होईल अशीही भीती आहे. त्यामुळेच अनेक राज्यांत नव्याने निर्बंध लावले जात असतानाच पश्चिम बंगाल सरकारने आज मोठा निर्णय घेत राज्यात मिनी लॉकडाऊन लावला आहे. त्याबाबत लगेचच गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा Lockdown Updates: या राज्यातील पाच जिल्ह्यांत कडक निर्बंध लागू
राज्याचे मुख्य सचिव एच. के. द्विवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन नवीन निर्बंधांबाबत माहिती दिली. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, स्पा सेंटर, सलून, ब्युटी पार्लर, प्राणीसंग्रहालय, मनोरंजन पार्क, स्वीमिंग पूल, जीम, पर्यटन स्थळे उद्यापासून (३ जानेवारी) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील, असे द्विवेदी यांनी सांगितले. शासकीय आणि खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने चालवण्यात येतील. सर्व प्रशासकीय बैठका व्हर्च्युअल माध्यमातून होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शॉपिंग मॉल्स, दुकाने, बार, रेस्टॉरंट्स येथे एकूण क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांची मर्यादा बंधनकारक असेल. तसेच रात्री १० वाजेपर्यंतची वेळही निर्धारित करण्यात आली आहे. सिनेमागृहांसाठीही ५० टक्के क्षमता आणि रात्री १० वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. लग्न समारंभ, अंत्यविधी तसेच सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम याठिकाणी ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. लोकल ट्रेन ५० टक्के क्षमतेने (आसन संख्येनुसार) सायंकाळी सात वाजेपर्यंतच चालवण्यात येणार आहेत. त्याचवेळी मेट्रो ट्रेनही ५० टक्के क्षमतेने चालवल्या जातील, असेही नमूद करण्यात आले आहे. रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच वाहने वगळता खासगी वाहने व सामान्य नागरिकांना पूर्णपणे मनाई राहणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसत आहे. शनिवारी राज्यात ४ हजार ५१२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यात कोलकाता महापालिका क्षेत्रातच तब्बल २ हजार ३९८ नवे रुग्ण आढळले. त्यामुळेच तातडीने पावले उचलत राज्य सरकारने लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध राज्यात लावण्याचा निर्णय घेतला आहे.