गुरुग्राम,दि.२: Lockdown Updates: देशात कोरोना बाधितांची संख्या (Corona Cases In India) वाढत आहे. अशातच देशात ओमिक्रॉन व्हेरीयंट (Omicron Variant) रुग्णांची संख्याही वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांना यापूर्वीच निर्देश दिले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचे संकट पुन्हा एकदा घोंगावू लागले असून हरयाणा (Haryana) सरकारने तर आज नवीन गाइडलाइन्स जारी करत राज्यातील पाच प्रमुख जिल्ह्यांत लॉकडाऊनसारखे निर्बंध लागू केले आहेत. पुढील दहा दिवसांसाठी हे निर्बंध असणार आहेत. वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लावण्याच्या उद्देशाने सरकारकडून हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.
हरयाणात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत चालला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी राज्यात २६ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता ६३ झाली आहे. दुसरीकडे दैनंदिन करोना बाधित रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. ३० डिसेंबर रोजी राज्यात २१७ तर ३१ डिसेंबर रोजी ४२७ नवीन रुग्ण आढळले आहेत. ही स्थिती लक्षात घेत राज्य सरकारने तातडीने मोठी पावले टाकत निर्बंध कडक केले आहेत. गुरुग्राम , फरीदाबाद, अंबाला, पंचकुला आणि सोनीपत या पाच प्रमुख जिल्ह्यांसाठी नवीन गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. २ जानेवारी ते १२ जानेवारीपर्यंत हे निर्बंध असणार आहेत.
हरयाणातील या पाचही जिल्ह्यांत पुढील १० दिवस सर्व शाळा-कॉलेज, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, सिनेमागृहे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुकाने तसेच शॉपिंग मॉल सायंकाळी पाच वाजेपर्यंतच खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सरकारी आणि खासगी कार्यालयांबाबतही नवे निर्देश दिले गेले असून या कार्यालयांत ५० टक्केपेक्षा अधिक उपस्थिती असू नये, असे बजावण्यात आले आहे. याआधी गेल्याच आठवड्यात संपूर्ण राज्यात नाइट कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे.