लक्ष्मण हाके यांची शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांचा उल्लेख करत ही मागणी

0

मुंबई,दि.22: ओबीसी नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षण बचाव मोहिम सुरू केली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन बेकायदेशीर आहे. मनोज जरांगे करत असलेल्या मागण्याही बेकायदा आहेत. जरांगे कोणाच्या तरी स्क्रिप्टवर राजकारण करत आहेत. दंगली घडवण्याचा ओबीसींचा इतिहास नाही. असे लक्ष्मण हाके म्हणाले.

महामानवांच्या पुतळ्याखाली बसून आम्ही कधी शिवीगाळ केली नाही. ते अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात. आमच्यात फूट पाडण्याचे काम मनोज जरांगे पाटील करत आहेत, या शब्दांत लक्ष्मण हाके यांनी हल्लाबोल केला.

शरद पवार आणि उध्दव ठाकरेंनी…

मराठा ओबीसी प्रश्न राज्यात तीव्र स्वरुप घेत असताना हा वाद शरद पवारांनी सोडवला पाहिजे. शरद पवार हेही मनोज जरांगेंची भाषा बोलत आहेत. ओबीसी आरक्षणावर शरद पवार मूग गिळून गप्प बसले. शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांनीही बोलायला हवे, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या ओबीसींच्या मनात स्वाभिमान आणि विश्वास निर्माण केला पाहिजे. महाराष्ट्रात कुणबींच्या बोगस नोंदी झाल्या आहेत. त्या किती झाल्यात हे सरकारने सांगावे, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली.

जालन्यातील दोदडगाव येथून मंडल स्तंभाला अभिवादन करून ओबीसी बचाव जनआक्रोश यात्रा सुरु करण्यात आली. गावगाड्यातल्या लोकांपर्यंत लोकशाहीची तत्व गेली पाहिजे. त्यांच्यात स्वाभिमान निर्माण झाला पाहिजे. तुमचे आमचे आरक्षण वाचवायला आता शाहू फुले आंबेडकर येणार नाहीत. आपल्यालाच ते वाचवावे लागेल. त्यामुळे सर्व ओबीसी भटक्या विमुक्त जातींनी एकत्र आले पाहिजे, असे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here