मुंबई,दि.१३: तिच्यावर आम्ही काय बोलणार, आम्ही घरंदाज बायका तिच्यावर बोलणार नाही असे म्हणत शिवसेना नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर सडकून टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त करून राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालं होतं. तेव्हा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक आणि नंतर सुटका अशा अनेक नाट्यमय घडामोडींमुळे राणा दाम्पत्य चांगलंच चर्चेत आलं. तेव्हापासून राणा दाम्पत्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सातत्याने आरोप केले आहेत.
राणा दाम्पत्याने अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर देखील नुकतेच गंभीर आरोप केल्यानंतर त्यावरून राजकीय वातावरण पेटलं आहे. राणा दाम्पत्याच्या आरोपांवर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकरांनी नवनीत राणांवर गंभीर शब्दांत टीका केली असून त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
गंभीर आरोप
रवी राणा यांनी नुकताच आरती सिंह यांच्यावर उद्धव ठाकरेंचं नाव घेत आरोप केला आहे. “आरती सिंह यांनी अडीच वर्षांत महिन्याला ७ कोटी रूपये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पोहोचवले. याप्रकरणाची आता उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत”, असा दावा रवी राणा यांनी केला आहे.
“आम्ही घरंदाज बायका तिच्यावर..”
दरम्यान, यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणांचं नाव न घेता त्यांच्यावर गंभीर शब्दांमध्ये टीका केली आहे. “तिच्यावर मी बोलणार नाही. ज्या मुलीने १३व्या वर्षी घाणेरड्या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली आहे, तिच्यावर आम्ही काय बोलणार? आम्ही घरंदाज बायका तिच्यावर बोलणार नाही”, असं त्या म्हणाल्या.
सी ग्रेड अभिनेत्री
शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनीदेखील नवनीत राणांवर अशाच प्रकारची टीका केली होती. “तुम्ही म्हणाल शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली. म्हणून मातोश्री आणि मातोश्रीचे विचार हिंदुत्ववादी राहिले नाहीत. बाळासाहेबांचे राहिले नाहीत. मात्र, याच मातोश्रीवर माननीय बाळासाहेबांनी मुस्लीम कुटुंबीयांना त्यांची नमाजाची वेळ झाल्यानंतर नमाज अदा करण्याची विनंती केली होती आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नमाज अदाही केला होता. हे तुमच्यासारख्या ‘मुंबईची मुलगी’ म्हणून घेणाऱ्या बाईला माहिती पाहिजे. ही मुंबईची मुलगी कदाचित त्यावेळी ‘सी’ ग्रेड फिल्म करण्यात बिझी होती. आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवते. हे महाराष्ट्र आणि मुंबईला पक्के कळले आहे”, असं संजना घाडी म्हणाल्या होत्या.