किरीट सोमय्या यांनी केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप

0

मुंबई,दि.२३: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने (ED) मंगळवारी कारवाई केली. या कंपनीच्या मालकीच्या ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिकांवर ‘ईडी’ने टाच आणली असून, ही मालमत्ता ६ कोटी ४५ लाखांची आहे. उद्धव ठाकरेंच्या मेहुण्यावर कारवाई झाल्याने सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंची रात्रीची झोपही उडणार असल्याचा इशारा दिला आहे.

“श्रीधर पाटणकर आणि त्यांचे कारनामे यासंदर्भात मी गेल्या दीड वर्षांपासून ईडीला पाठपुरावा करत आहे. मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारामुळे त्यांच्याकडे कोटींची मालमत्ता आहे. ईडीने एका व्यवहाराची माहिती दिली असून ३० कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. ईडीला गेल्या दीड वर्षात कोट्यवधींची माहिती दिली आहे. सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोपही उडणार आहे,” असा इशारा किरीट सोमय्या यांनी यावेळी दिला.

उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांचे संबंध काय? अशी विचारणा यावेळी किरीट सोमय्यांनी केली. “नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय? हे माझं वाक्य संपल्याबरोबर उद्धव ठाकरेंची माफिया सेना लगेच बोंबाबोंब सुरु करणार. याआधी मी असाच प्रश्न विचारला होता. उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईकडे संबंध काय?,” असं सोमय्या म्हणाले.

“ठाकरे साहेबांनी त्यांचे आणि परिवाराचे आर्थिक व्यवहार, व्यवसायिक संबंध सांगितले तर किरीट सोमय्या, ईडी किंवा न्यायालयाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. १९ बंगले लपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. पण खरं बाहेर आलंच. २०१९ मध्ये रश्मी उद्धव ठाकरे बंगले माझे आहे सांगतात आणि २०२१ मध्ये उद्धव ठाकरे बंगलेच नाही सांगतात. पाटणकर आणि रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यातील आर्थिक संबंध व्यवहारावर उद्धव ठाकरे बोलणार आहेत का?.” अशी विचारणा किरीट सोमय्यांनी केली आहे.

“मुख्यमंत्री परिवाराला माझी विनंती आहे की जे आर्थिक व्यवहार आहेत, शेल कंपन्यांकडून पैसे घेतले, मनी लाँड्रिंग केलं त्यासंबंधी तुम्ही माहिती देणार की मलाच द्यावी लागणार. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी २०१४ मध्ये कोमास प्रॉपर्टीज कंपनी जी बनवली होती. यामध्ये आदित्य ठाकरे मालक पण, संचालक पण, ५० टक्के त्यांचे आणि ५० टक्के रश्मी ठाकरेंचे…या कंपनीची आता नंदकिशोर चतुर्वैदीच्या मालकीची आहे. हा हवाला ऑपरेटर असून ३० कोटींच्या व्यवहारात त्यांचा समावेश आहे. ठाकरे परिवाराने जी कंपनी बनवली होती ती नंदकिशोर चतुर्वेदींना का दिली?,” अशी विचारणा किरीट सोमय्यांनी केली आहे.

“जसा अन्वय नाईकचा घोटाळा बाहेर काढल्यानंतर माफिया सेनेचे १२ नेते अंगावर आले होते. तीन वेळा हल्ला केला होता आता कुठे आहेत? पाच मिनिटानंतर हल्ला सुरु करणार. कारण नंदकिशोर हा हवाला ऑपरेटर आहे. त्यांची कंपनी ठाकरे कुटुंबाने तयार केली आहे. ती कंपनी कधी, कशी आणि का दिली? नंदकिशोर चतुर्वैदी आणि ठाकरे कुटुंबाचे संबंध काय? ठाकरे परिवाराचा हा पहिलाच मनी लाँड्रिंग व्यवहार आहे का? यासंबंधी महाराष्ट्राच्या जनतेला माहिती हवी आहे,” असं सोमय्या म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here