मुंबई,दि.२५: माजी खासदार भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं सातत्याने समोर आणत निशाणा साधला, आता ते स्वतः वादात अडकले आहेत. किरीत सोमय्यांचा एक फोटो या वादासाठी कारणीभूत ठरला आहे. किरीट सोमय्या काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात गेले होते तेव्हा हा फोटो काढण्यात आला होता. या फोटोत किरीट सोमय्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईली तपासत होते. सरकारी अधिकाऱ्यांनी किरीट सोमय्यांना थेट मंत्रालयात प्रवेश दिल्याने खळबळ उडाली असून फोटोमध्ये नगरविकास खात्यातील अधिकारी किरीट सोमय्या यांच्यासमोर उभे असल्याचं दिसत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात गेले होते. याठिकाणी ते अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल्स चाळतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत नगरविकास खात्यातील अधिकारी किरीट सोमय्या यांच्यासमोर उभे असल्याचे दिसत आहे. यावरुन आता राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यावरुन टीका केली असून म्हटलं आहे की, “भाजपा नेत्यांची मानसिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. सत्ता गेल्यापासून त्यांचं वर्तन अत्यंत बेफाम झालं आहे. महाविकासआघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची त्यांची तयारी आहे”.
“किरीट सोमय्या ज्या पद्धतीने नगरविकास खात्याच्या मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासत होते त्याची चौकशी करण्याची गरज आहे. जर त्यांनी आरटीआय अंतर्गत परवानगी घेतली नसेल तर हा गुन्हा आहे, म्हणूनच चौकशी व्हावी. जर गुन्हा घडल्याचं सिद्ध झाला तर गुन्हा दाखल झाला पाहिजे,” अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.