मुंबई,दि.31: शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुखपदी आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे ठाणे महापालिकेतील नगरसेवकही शिंदे गटात सामिल झाले. ठाण्यातील बालेकिल्ला वाचवण्यासाठी शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती जाहीर केली आहे.
तर, आनंद दिघे यांच्या सहकारी असलेल्या अनिता बिर्जे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी ही माहिती दिली आहे. केदार दिघे यांच्या नियुक्तीनंतर ठाण्यात पुन्हा शिवसेनेचे दिघे राज सुरू होईल का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
आज ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे, केदार दिघे, अनिता बिर्जे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मातोश्रीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेसोबत कायम असल्याची ग्वाही शिवसैनिकांनी दिली. या भेटीनंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने नवीन नियुक्त्या जाहीर केल्या.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्हा प्रमुखपदी केदार दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या अनिता बिर्जे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदीप शिंदे यांच्यावर ठाणे शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून चिंतामणी कारखानीस यांची ठाणे विभागीय प्रवक्ते पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे हे ठाण्यातील शिवसेनेचा चेहरा झाले होते. ठाणे, पालघर, कल्याण-अंबरनाथ या पट्ट्यात एकनाथ शिंदे यांनी वर्चस्व निर्माण केले. शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी ठाणे, पालघरमधून मोठी पाठिंबा मिळण्याची शक्यता शिवसेना नेत्यांनी गृहीत धरली होती. बंड चिघळल्यानंतर शिवसेना वाचवण्यासाठी अनेक जु्ने शिवसैनिक सक्रिय झाले आहेत.