Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा, 10 मे रोजी मतदान

0

नवी दिल्ली,दि.29: Karnataka Election 2023: देशाचं लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणूकांच्या तारखांची घोषणा अखेर झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) आज (29 मार्च) कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (Karnataka Assembly Election 2023) घोषणा केली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान आहे. राज्यात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यासोबतच कर्नाटकात आचारसंहिता लागू झाली आहे.

कर्नाटकच्या 224 विधानसभेच्या जागांसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, अनुसूचित जातीसाठी 36 जागांवर आरक्षण आहे, तर अनुसूचित जमातींसाठी 15 जागा राखीव आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी 10 मे रोजी मतदान घेण्यात येणार असून  13 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्यात एकाच टप्प्यात मतदान होत आहे. 10 मे रोजी मतदानादिवशी बुधवार येत आहे. तर, मतदानासाठी मुद्दामहून बुधवार निश्चित करण्यात आला आहे. कारण, त्यामागे निवडणूक आयुक्तांनी सुट्टीचं गणितही मांडलं. 

कर्नाटकात 9.17 लाख नवे मतदार : मुख्य निवडणूक आयुक्त | Karnataka Election 2023

कर्नाटकात 2018-19 मध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या 9.17 लाखांनी वाढली आहे. 1 एप्रिलपर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे सर्व तरुण मतदार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करु शकतील, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच कर्नाटक राज्यातील 224 विधानसभा मतदारसंघात 5,21,73,579 नोंदणीकृत मतदार आहेत. राज्यभरात 58,282 मतदान केंद्रे उभारणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली.

निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023
उमेदवारी अर्ज छाननी तारीख – 21 एप्रिल 2023
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख – 24 एप्रिल 2023
मतदानाची तारीख -10 मे 2023
मतमोजणीची तारीख – 13 मे 2023

दरम्यान 2018 मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम 27 मार्च रोजी जाहीर झाला होता. यंदा आज म्हणजेच 29 मार्च रोजी तारखा जाहीर झाल्या आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे.

2018 च्या निवडणुकीचा निकाल?

कर्नाटकमध्ये 2018 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. भाजपने 224 जागांपैकी 104 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 80 जागा आणि जेडीएसने 37 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या आमदारांनी बंड केलं आणि भाजपमध्ये सामील झाले. कर्नाटकात सध्या भाजपकडे 119 जागा आहेत. तर काँग्रेसकडे 75, तर मित्रपक्ष जेडीएसकडे एकूण 28 जागा आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here