सोलापूर,दि.1: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी X वर पोस्ट केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेकांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला आहे. तर निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की ईव्हीएम हॅक करता येत नाहीत. निवडणुका पारदर्शक पद्धतीने घेतल्या जातात. मात्र विरोधी पक्षांनी मतदान बॅलेट पेपवर घ्यावे असे मत व्यक्त केले आहे. जितेंद्र आव्हाड हे सातत्याने ईव्हीएम मशीनवर बोलत आहेत.
आव्हाड यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यात त्यांनी निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक मतदारसंघात उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाकडे पैसे भरले आहेत. निवडणूक आयोगाकडून त्या उमेदवारांना तारीख दिली जाईल. त्या तारखेला फेर मतमोजणी होईल.
मात्र फेर मतमोजणीवरच जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. मतदान यंत्रातील माहितीच नष्ट केल्याने यंत्रात काहीच बिघाड नव्हता, हे दाखवण्यास दुसरी यंत्रे दाखवली जाणार असल्याचा जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केला. ज्या यंत्रात मतदान झाले, ती दाखवणार नसतील आणि त्याजागी दुसरी यंत्रे दाखवणार असतील, तर फेरमतमोजणीचा उपयोग काय आहे. ज्या मतदान यंत्रात मतदान झाले, त्यातील मतदानाची माहिती नष्ट केली आहे. असा दावा आव्हाड यांनी केला. आव्हाड यांना अनेकांनी कशाला मुर्ख बनवता म्हणत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आव्हाड यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, महाराष्ट्राच्या निवडणुकीतील आकडेवारी जुळता जुळेना !
ECI नुसार, महाराष्ट्रातील एकूण मतदार 9,64,85,765 आहेत आणि यंदा मतदानाची टक्केवारी 65.02% होती.
साधे गणित आहे – 65.02% of 9,64,85,765 = 6,27,35,044.4 परंतु ECI ने 6,40,88,195 लोकांनी मतदान केल्याची नोंद केली आहे. यात अतिरिक्त 13,53,151 मते आहेत.
इतकेच नाही, तर 65.02% केल्यास त्यात 0.4 मतं असं गणित येतं. राज्यातच काय, संपूर्ण विश्वात अपूर्णांक मतं कशी असू शकतात? 13 लाख अतिरिक्त मते आली कुठून?
आता मतदार नोंदणी पाहू. 2019 ते 2024 (5 वर्षे) महाराष्ट्रातील मतदारांची संख्या 50 लाखांनी वाढली, म्हणजे सरासरी प्रतिवर्षी 10 लाख. पण 2024 च्या सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अवघ्या 6 महिन्यांत मतदारांची संख्या 42 लाखांनी वाढली. 6 महिन्यांत 42 लाख वाढ म्हणजे 84 लाख/वर्षाचा वाढीचा दर, जो गेल्या 5 वर्षांतील सरासरी वार्षिक दराच्या 8.4 पट आहे! हा मतदार नोंदणीचा चमत्कार आहे कि मतांमध्ये फेरफार आहे, हे तुम्हीच ठरवा. असे आव्हाड यांनी म्हटले आहे.