Jitendra Awhad: खरं बाहेर आणण्याची वेळ आली आहे: जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad News: जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'शाहू छत्रपती' सिनेमाची घोषणा केली होती

0

मुंबई,दि.१: राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी खरं बाहेर आणण्याची वेळ आली आहे असे म्हटले आहे. अलीकडच्या काळात ऐतिहासिक चित्रपट तयार करण्यात येत आहेत. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप होत आहे. जितेंद्र आव्हाड राजर्षी शाहू महाराजांवर चित्रपट घेऊन येणार असल्याची माहिती काही महिन्यांपूर्वी समोर आली होती.

स्वत: जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘शाहू छत्रपती’ सिनेमाची घोषणा केली होती. दरम्यान सध्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरुन राजकारण्यातील बड्या व्यक्ती एकमेकांवर ताशेरे ओढत असताना, या सिनेमाविषययी आव्हाडांची आणखी एक प्रतिक्रिया समोर आली आहे.

सिंधुदुर्ग याठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची ही ‘शाहू छत्रपती’ सिनेमाविषयीची प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी ते ‘सिनेमॅटिक लिबर्टी’विषयी बोलले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार आव्हाडांचा हा चित्रपट ८ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होणार असून राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांसाठी केलेलं मोलाचं कार्य या सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल.

View this post on Instagram

A post shared by Jitendra Awhad (@jitendra.awhad)

राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग याठिकाणी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वादावर भाष्य केले. सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याशिवाय इतिहास दाखवता येणारच नाही, असं खुद्द इतिहासकार सांगतात अशी प्रतिक्रिया यावेळी राज ठाकरेंनी दिली. यानंतर आव्हाडांची सिनेमॅटिक लिबर्टीवरील प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आव्हाड यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘लोकांना शाहू महाराज, शिवाजी महाराज, फुले आणि आंबेडकर ही जी ओळ आहे ती ओळ समजावून सांगण्याचा आमचा विचार आहे. ही ओळ जेव्हा आम्ही समजावून सांगू तेव्हा आम्ही इतिहासकारांचे दाखले घेणार आहोत, त्यांचे सही-शिक्के घेणार आहोत. उगाच ‘सिनेमॅटिक लिबर्टी’च्या नावाखाली काहीही दाखवणार नाही. ते मी करत नाही, ज्यांना काम दिले आहे त्यांनी मला येऊन फक्त काय केले ते सांगायचे. यापेक्षा जास्त माझा हस्तक्षेप त्यात नसेल.’

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, ‘सिनेमा कसा काढावा, नट कोण असेल याच्याशी माझा काही संबंध नसेल. माझं स्पष्ट मत एवढंच आहे की तुमचं कथानक झालं की ती इतिहासकारांना ऐकवून दाखवा, त्या इतिहासकारांनी मला सांगितलं की जितेंद्र आम्ही ऐकलं-वाचलं, हे योग्य आहे. तर त्याच्यानंतर पुढचं पाहू. खरं बाहेर आणण्याची वेळ आली आहे.’ पुढील वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here