मुंबई,दि.३: Jitendra Awhad On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काल २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ठाकरे शैलीत राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
यावेळी राज ठाकरे यांनी यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यावर विचार मांडले. “माझी पंतप्रधानांना विनंती आहे की झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवर धाडी टाका. पोलिसांना देखील माहिती आहे. तुम्हाला पाकिस्तानची गरज नाही, या झोपडपट्टीत इतक्या गोष्टी हाती लागतील,” असं राज ठाकरे म्हणाले.
त्यावर आता मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरेंना आव्हान दिले आहे. मदरशात एक वस्तरा सापडला तर राजकारण सोडेन, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. राज ठाकरेंकडून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज ठाकरे यांनी आग लावण्याचं काम करु नये, त्यांचा उद्देश स्पष्ट दिसतोयअसंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम राज ठाकरे करत आहेत. कालपर्यंत महाराष्ट्राचा विकासाची, रोजगाराची भाषा करणारे राज ठाकरे यांनी कालपासून तरूणांना रोजगार देण्याचे काम सुरू केले आहे. तरूणांनी मशिदी समोर जायचे. यामुळे दोन्हीकडून आग लागेल. राज ठाकरे राजतीर्थावर घरी निवांत बसून मजा बघतील. आंदोलन करणारे तुरुंगात जातील, सोडायला कोणीही येत नाही. मग आई वडिलांना धावपळ करावी लागते. हे जुने गणित आहे.
जय भीम कधी म्हणाले का?
काल त्यांना अचानक बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा पुळका आला. कधी आयुष्यात जय भीम म्हणाले आहेत का? कधी घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या चैत्यभूमीवर गेलेत का? असा सवाल देखील आव्हाडांनी या वेळी उपस्थित केला.