असं करायचं नसतं जितेंद्र आव्हाड यांनी लाऊडस्पीकर वादावरून राज ठाकरे यांच्यावर केली टीका

0

मुंबई,दि.10: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी लाऊडस्पीकर वादावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर सभा घेतली. यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध केला. आपला प्रार्थनेला विरोध नसून भोंग्यांना आहे असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करायलाच पाहिजे अशी भूमिका घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्यात ‘उत्तर सभा’ घेतली. 1 मेला औरंगाबाद येथे राज ठाकरे यांनी सभा घेतली.

ठाण्यात झालेल्या उत्तर सभेमध्ये आणि शेवटी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेमध्ये मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. 3 मे रोजी ईद झाल्यानंतर 4 मे पासून राज्यभर मशिदींवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन राज ठाकरेंनी सगळ्यांना केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात वातावरण तापलं असताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील ईदगाह मैदान परिसरातील सभागृह बांधकाम शुभारंभ प्रसंगी आव्हाड हे बोलत होते.

“असं करायचं नसतं”

“आज 10 वाजल्यानंतर तुम्ही या रस्त्यावरून कुठेही गेलात, तर सगळीकडे शांतता असते. देवळातून टाळ-मृदुंगाचा आवाज येतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. सकाळी गेलेला शेतकरी रात्री परत येतो तेव्हा देवळात जातो. डोकं शांत करत भजन-कीर्तन करतो. तुमच्या आरत्या-भजन कीर्तन बंद झालं. तुम्ही मारायला गेला होतात कुणाला आणि मारलंत कुणाला. असं करायचं नसतं”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“स्वत: माणूस जेव्हा मातीत खड्डे खणतो, तेव्हा तोच खड्ड्यात पडतो. सर्वात जास्त नुकसान हिंदू समाजाचं झालं. धर्मा-धर्मात भांडणं लावून झाली. ते जमलं नाही. आता जाती-जातीत भांडणं लावतील”, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी मुस्लीम समाजातील मुलांना मराठीचं शिक्षण देण्याची भूमिका मांडली. “मी समाजहिताचं बोलतो. मुस्लीम समाजाचं हित शाळेत जाऊन मराठी शिकण्यामध्ये आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धापरीक्षा मराठीत होतात. ही मुलं मराठी शिकलीच नाहीत, तर ती मुख्य प्रवाहातून लांब फेकली जातील. त्यांना मराठी शिकवावीच लागेल. फक्त मतांचं राजकारण करायचं नाही. त्यांच्या हिताचं काय आहे, तेही बघायचं. त्यांचं हित जपलं तर ते मतं देतीलच. पण मतांसाठी बोलायचं नाही हे मला पटत नाही. त्यामुळे मी बोलतो”, असं आव्हाड म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here