तुम्ही त्यांची बाजू घ्यायची याला जातपात म्हणतात; जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

जातीपातीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस करत नसून राज ठाकरेच करत असल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा दावा

0

मुंबई,दि.१: राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी जातीपातीचं राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने जातीपातीचं राजकारण सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याआधीही राज ठाकरेंनी अनेकदा या मुद्द्याचा पुनरुच्चार केला होता. यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीव्ही ९ शी बोलताना राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. जातीपातीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस करत नसून राज ठाकरेच करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, हर हर महादेव चित्रपटाला मनसेनं पाठिंबा दिल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी टीका केली.

तुम्ही त्यांची बाजू घ्यायची याला जातपात म्हणतात

“जात-पात-धर्म हे कुठल्या निकषांमध्ये मोजले जातात हेच मला कळत नाही. राष्ट्रवादीचा जन्म १९९९ साली झाला. जेम्स लेननं शिवाजी महाराजांच्या पितृत्वावर शंका निर्माण केली २००३ मध्ये. पण जेम्स लेनला ज्यांनी ही माहिती दिली होती ते लेले, मेहेंदळे, भंडारी यांची जाऊन तुम्ही माफी मागितली. त्यांनी आमच्या आईची चुकीची माहिती द्यायची, महाराजांची बदनामी करायची आणि तुम्ही त्यांची बाजू घ्यायची याला जातपात म्हणतात. तेव्हाही या लढाईत सगळ्यात आघाडीवर मी होतो. मी मराठा नाही, मागासवर्गीय आहे. मराठा हा शब्द महाराष्ट्राची ओळख आहे. तो आत्ता जातीपातींमध्ये आला आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मग कोण करतंय जातीपातीचं राजकारण?

“बाबासाहेब पुरंदरेंविरोधात आम्ही बोललो तेव्हा तुम्ही पुरंदरेंची बाजू घेतली. तेव्हा तुम्हाला जातपात लक्षात आली नाही का? हर हर महादेवमध्ये अतिशय विकृत चित्रण दाखवलं गेलं आहे. तुम्ही शिवाजी महाराजांची बुद्धी, शौर्य या सगळ्यावर पाणी टाकलंत. नवीन एक जात, वर्ण, वर्चस्ववादाला सुरुवात केली की बाजीप्रभू देशपांडे महाराजांच्या तुलनेत होते आणि त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला असं या चित्रपटात दाखवलं. या चित्रपटाला तुम्ही पाठिंबा दिलात. मग कोण करतंय जातीपातीचं राजकारण? सत्य लोकांसमोर आणलं पाहिजे”, अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी यावेळी केली.

त्यांनी काहीही केलं तरी चालतं

“हे जातीपातीचं राजकारण वगैरे काही नसतं. हे फक्त बोलण्यापुरतं असतं. जेव्हा ते करतात तेव्हा ते बरोबर असतं. कारण ते महान आहेत. त्यांनी काहीही केलं तरी चालतं. पण आता काळ बदललाय. सगळंच तुमच्या मनासारखं होईल, असं नाही होत आता. गोष्टी बदलल्या आहेत”, असंही जितेंद्र आव्हाड राज ठाकरेंना उद्देशून म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here