राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची भूमिका केली स्पष्ट

0

मुंबई,दि.२३: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात सध्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत. सत्ता जाते म्हटल्यावर आमच्या आजुबाजूच्याही काही आमदारांच्या मनात दुसरीकडे जाण्याचे विचार येत आहेत. त्यांनी आमच्याकडे तसं बोलूनही दाखवलं. पण आम्ही त्यांना एवढचं सांगितलं की, या सगळ्यावर आपण विरोधी पक्षात बसायची तयारी करणे हाच एकमेव पर्याय आहे. असे जयंत पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार टिकावे, हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. या संकटात आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. आम्ही त्यांना शक्य ती सर्व मदत करू. राष्ट्रवादी काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. तब्बल दोन तास सिल्व्हर ओकवर राजकीय खलबतं सुरु होती. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी जयंत पाटील यांनी म्हटले की, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी या संकटात आम्ही तुमच्यासोबत असल्याचे उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत हे सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करेल. महाराष्ट्राच्याबाहेर असलेले शिवसेना आमदार परत येतील आणि पुन्हा आपल्या पक्षात कार्यरत होतील, हा विश्वास आम्हाला आहे. ते परत आल्यावर चित्र स्पष्ट होईल. पण आमचा उद्धव ठाकरे नेतृत्त्व करत असलेल्या सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी जयंत पाटील यांनी वेळ पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसायला तयार असल्याचे संकेत दिले. आम्ही आमच्या सर्व आमदारांना सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती देण्यासाठी मुंबईत बोलावले आहे. सत्ता जाते म्हटल्यावर आमच्या आजुबाजूच्याही काही आमदारांच्या मनात दुसरीकडे जाण्याचे विचार येत आहेत. त्यांनी आमच्याकडे तसं बोलूनही दाखवलं. पण आम्ही त्यांना एवढचं सांगितलं की, या सगळ्यावर आपण विरोधी पक्षात बसायची तयारी करणे हाच एकमेव पर्याय आहे. यावर पत्रकारांनी जयंत पाटील यांना तुम्ही विरोधी पक्षात बसायची तयारी केली आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर जयंत पाटील यांनी म्हटले की, विरोधी पक्षात बसायची तयारी करावी लागत नाही. परिस्थिती ती वेळ आणते, असे जयंत पाटील यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here