मुंबई,दि.29: जरंडेश्वर कारखान्याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. राज्यातील लोकसभा निवडणूक संपताच चौकशी सुरू झाल्याने चर्चांना उधाण आले होते. जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळय़ात ईडीने अजित पवार यांना दिलासा दिला होता. साखर कारखान्याची चौकशी करून आरोपपत्र दाखल करताना ईडीने आरोपी म्हणून असलेले अजित पवार यांचे नाव वगळले होते.
अजित पवार यांचा काय संबंध?
कर्जामध्ये बुडालेला जरंडेश्वर कारखाना अजित पवार यांच्या गुरू कमोडिटी या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने लिलाव प्रक्रियेतून खरेदी केला होता. ती लिलाव प्रक्रिया बोगस होती, असा आरोप करीत शालिनीताई पाटील यांनी कोर्टाचे दार ठोठावले. त्यावर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई ईओडब्ल्यूकडे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ईडीने चौकशी सुरू केली होती.
निवडणुकीपूर्वी अजित पवार यांना ईडीसह मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) दिलासा दिला होता. ईओडब्ल्यूने शिखर बँक घोटाळय़ात अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांना क्लीन चिट दिली होती.
हेही वाचा Lok Sabha 2019: लोकसभा 2019 मध्ये सर्वात कमी फरकाने जिंकल्या या जागा
जरंडेश्वर कारखान्याची चौकशी | अजित पवार कार्यालयाकडून स्पष्टीकरण
जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चौकशीबाबत अजित पवार यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. पुणे लाचलुचपत विभागाकडून करण्यात येत असलेली ही चौकशी जुनी असून त्याच्याशी अजित पवारांचा काही संबंध नसल्याचं त्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत असलेली ही चौकशी 1990 ते 2010 या दरम्यान जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारांची आहे. या चौकशीचा अजित पवारांशी संबंध नाही. कोरेगाव तालुक्यातील कारखान्याच्या सभासदांकडून डिसेंबर 2021 मध्ये चौकशीसाठी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने 1990 ते 2010 या कालावधीत कारखान्याचे संचालक मंडळ, त्यांचे नातेवाईक अणि प्रशासक यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2022 पासून सुरू असलेल्या चौकशीची माहिती 17 मे 2024 ला तक्रारदाराला पत्राद्वारे देण्यात आली.