मुंबई,दि.5: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे हे एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहिले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे हे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहिले आहेत. बीकेसीवर सुरु असलेल्या दसरा मेळ्याला जयदेव ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी आपण शिंदे गटात असल्याचेही त्यांनी सांगितले. निहार ठाकरे यांच्यानंतर जयदेव ठाकरे यांनीही शिंदे गटाची वाट धरल्यामुळे हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान, एकनाथ शिंदेंसारखा धडाडीचा माणूस महाराष्ट्राला हवाय, म्हणून मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो, असे यावेळी जयदेव ठाकरे म्हणाले.
जयदेव ठाकरे म्हणाले
आम्ही ठाकरे काही लिखीत घेऊन येत नाही. एकनाथ माझ्या खूप आवडीचा आहे. आता मुख्यमंत्री झालाय, मला एकनाथ राव बोलावं लागेल. पाच सहा दिवस झाले. मला एक एक फोन येत आहेत. आहो, तुम्ही शिंदे गटात गेला आहात का? हा ठाकरे कुणाच्या गोटात बांधला जात नाही. शिंदे यांनी दोन चार भूमिका घेतल्या, त्या मला आवडल्या. असा धडाडीचा माणून महाराष्ट्राला हवा आहे. त्यामुळे मी म्हणून शिंदेंच्या प्रेमासाठी मी इथं आलो आहे.
आपला एक इतिहास आहे. चिपळ्या वाजवणारा एकनाथ आणि मध्यंतरीचा एकनाथ… त्यांना जवळच्यांनीच संपवलं. यांना एकटं पाडू नका. हा एकटा नाथ होऊ नका… हा एकनाथचं राहू द्या… ही तुम्हा सर्वांना विनंती आहे, असे जयदेव ठाकरे म्हणाले. सर्व बर्खास्त करा, राज्यात पुन्हा निवडणुका घ्या… राज्यात पुन्हा शिंदे राज्य येऊ द्या, असे जयदेव ठाकरे यावेळी म्हणाले.