कोल्हापूर,दि.18: कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात कलम 163 जारी केले आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023चे कलम 163 जारी केले आहे. शुक्रवार(दि. 19)पर्यंत कोल्हापूर जिह्यात या कलमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
किल्ले विशाळगड येथील अनधिकृत अतिक्रमणांबाबत काही असामाजिक घटक समाजात तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण वा चित्रफीत मोबाईल, तसेच सोशल मीडियाद्वारे प्रसारित करून सामाजिक अस्थिरता, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. याकरिता कलम 163 जारी केले आहे.
या कलमानुसार कोणत्याही व्यक्तीस इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमाद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरविणारे संदेश पाठविणे, खोटी माहिती पोस्ट वा फॉरवर्ड करणे आणि जिल्ह्यात समाजात तेढ निर्माण होईल असे बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग प्रदर्शित करण्यास मनाई केली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास प्रचलित कायद्यान्वये फौजदारी कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद केले आहे.
गजापूर पैकी मुसलमानवाडी (ता. शाहूवाडी) येथे तातडीची मदत म्हणून प्रापंचिक साहित्यासाठी व घरदुरुस्तीसाठी 50 हजार रुपयांच्या मदतीचे वाटप शासनाकडून करण्यात आले. मुसलमानवाडी येथील अंदाजे 41 घरांची जमावाने नासधूस करून प्रापंचिक साहित्याचे नुकसान केले होते. या नुकसानीबाबत विस्तृत अहवाल पंचनामे करून शासनास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादर केलेले आहेत. वाडीमध्ये अंदाजे 56 कुटुंबे राहतात. या 56 कुटुंबांना शासनातर्फे तातडीची मदत म्हणून आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रत्येकी प्रापंचिक साहित्यासाठी 25 हजार रुपये आणि घरदुरुस्तीसाठी 41 घरांना प्रत्येकी 25 हजार रुपये मदतीचे धनादेश देण्यात आले.