सोलापूर,दि.१६: दारूच्या नशेत वरिष्ठांना शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिस हवलदाराची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. यात हकिकत अशी की दिनांक ०३.०५.२०१७ रोजी संध्याकाळी ०७:०० वाजण्याच्या सुमारास राज्य राखीव पोलिस दल गट क्र.१०, सोलापूर या बराकीमध्ये कर्मच्याऱ्यांची हजेरी चालू होती. त्यावेळेस आरोपी सिताराम भिमराव बनसोडे यांनी दारूच्या नशेत आपल्या वरिष्ठांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली.
त्यावेळी सदर पोलिस दलातील हवलदार सहकाऱ्यांना व वरिष्ठ अधिकारी मनोहर गवळी यांनी सदर आरोपीस अटक करून सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्याचे आदेश दिले. सदर आरोपी सिताराम बनसोडेची वैद्यकिय तपासणी झाली. त्या वैद्यकिय तपासणीमध्ये सदर आरोपी बनसोडे हा दारूच्या अंमलाखाली आढळून आला. त्यामुळे सदर गवळी यांनी आपले दुसरे कनिष्ठ कर्मचारी काशिनाथ तिर्थकर यांना सदर आरोपी बनसोडे विरूध्द विजापूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
त्याप्रमाणे तिर्थकर यांनी सदर आरोपीविरूध्द दिनांक ०३.०५.२०१७ रोजी विजापूर नाका पोलिस स्टेशनमध्ये कलम ३५३, ५०४, ५०६ इ. पि. को. व कलम ८५ ( १ ) मुंबई दारू बंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला. सदर खटल्यात अभियोग पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. सदर खटल्यात फिर्यादी व वैद्यकिय अधिकाऱ्यांची उलटतपासणी महत्त्वाची ठरली.
सदर आरोपीतर्फे युक्तिवाद करतेवेळी ॲड. अभिजीत इटकर व ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुरेश गायकवाड यांनी असा युक्तिवाद केला की, आरोपीचे अव्यवस्थित वर्तन व दारूचा अंमल या दोन्ही गोष्टी अभियोग पक्षाने सिध्द करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतू अभियोग पक्षाने घटनेच्या वेळेस आरोपी दारूच्या अंमलाखाली होता असा कुठलाही ठोस पुरावा कोर्टामध्ये दाखल केलेला नाही. त्यामुळे आरोपीचे दारूच्या अंमलाखालचे अव्यवस्थित वर्तन सिध्द झालेले नाही. तसेच कुठल्याही प्रकारचा सरकारी कामात अडथळा निर्माण झालेला नव्हता.
सदरील आरोपींतर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधिश खेडेकर मॅडम यांनी सदर आरोपी सिताराम भिमराव बनसोडे यांची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर व ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुरेश गायकवाड यांनी काम पाहिले .