नवी दिल्ली,दि.२४: इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जागतिक स्तरावर तेल आणि वायू पुरवठ्यावर परिणाम झाला असून आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, भारतात घरगुती गॅस सिलिंडरचे वजन १४.२ किलोवरून १० किलो केले जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, केंद्र सरकारने आता या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट करत या सर्व केवळ ‘अफवा’ असल्याचे म्हटले आहे.
सिलिंडरचे वजन कमी होणार नाही
पेट्रोलियम मंत्रालयाच्या सचिवांनी स्पष्ट केले की, घरगुती LPG सिलिंडरमध्ये १४.२ किलोऐवजी १० किलो गॅस भरण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांतून पसरणारी ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सरकारने केले आहे. तसेच, गुजरातसह देशातील इतर भागांत इंधनाची कमतरता असल्याच्या बातम्याही त्यांनी फेटाळून लावल्या असून सर्व पेट्रोल पंप सुरळीत सुरू असल्याचे सांगितले आहे.
देशांतर्गत उत्पादनावर पंतप्रधान मोदींचा भर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत देशातील इंधन स्थितीचा आढावा घेतला. भारताच्या एकूण गरजेपैकी सुमारे ६० टक्के एलपीजी आयात केला जातो. होर्मुज सामुद्रधुनीमार्गे होणारी वाहतूक युद्धामुळे आव्हानात्मक बनली असली, तरी भारत सरकारने पुरवठा साखळी विस्कळीत होऊ नये यासाठी कंबर कसली आहे. सध्या सरकारने घरगुती वापराच्या गॅसला प्राधान्य दिले असून, देशांतर्गत उत्पादन वाढवण्याच्या हालचालींना वेग दिला आहे.
भारताची ऊर्जा सुरक्षा आणि तेलसाठा
ऊर्जा सुरक्षेबाबत बोलताना पंतप्रधानांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले:
• आयातीचे विविधीकरण: भारताने आता २७ ऐवजी ४१ देशांमधून तेल आयात करण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून एका क्षेत्रावर अवलंबून राहावे लागणार नाही.
• तेलाचा साठा: भारताकडे सध्या ५३ लाख मेट्रिक टन तेलसाठा उपलब्ध असून, तो ६५ लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.
• पुरवठा सुरळीत: युद्धजन्य परिस्थिती असली तरी पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी सरकार विविध स्तरांवर उपाययोजना करत आहे.








