मुंबई,दि.23: IND vs PAK: भारताने सामना जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरने विराट कोहलीसाठी खास ट्विट करत कौतुक केले आहे. विराट कोहलीची ‘विराट’ इनिंग आणि त्यानं हार्दिक पंड्यासोबत केलेली शतकी भागीदारी याच्या जोरावर भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात 4 विकेट्सनी सनसनाटी विजय मिळवला. अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर टीम इंडियाची सरशी झाली. नाबाद 82 धावा करणारा विराट कोहली भारताच्या या विजयाचा खऱ्या अर्थानं नायक ठरला. पाकिस्ताननं या सामन्यात भारतासमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतानं अखेरच्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर विजयी लक्ष्य गाठलं आणि खऱ्या अर्थानं मेलबर्नमध्ये दिवाळी साजरी केली.
या ऐतिहासिक सामन्यात टीम इंडियाने अक्षरशः पाकिस्तानच्या हातातून सामना खेचून आणला. विराट कोहलीची 82 धावांची खेळी टीम इंडियाच्या विजयासाठी महत्त्वपूर्व ठरली. या सुपर इनिंगनंतर आता किंग कोहलीवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाला भारतीयांना मोठी भेट दिल्याचे म्हणत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केले आहेत. अशातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने कोहलीच्या कौतुकाची एक खास पोस्ट केली आहे.
विराट कोहलीसाठी सचिनने लिहिले की, “विराट, ही तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी होती. तुला खेळताना पाहणे हे सर्वात आनंददायक होते, रौफविरुद्ध 19 व्या षटकात लाँग ऑनवर बॅकफूटवर मारलेला षटकार नेहमी लक्षात राहील.” विराटने 19 व्या षटकात अत्यंत महत्त्वाच्या वेळी दोन षटकार लगावत भारताची बाजू वर उचलून धरली होती, तर शेवटच्या षटकात अत्यंत हुशारीने खेळून विराटने नाबाद राहून टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या आधीच सचिन तेंडुलकरने टीम इंडियाला काही खास टिप्स सुद्धा दिल्या होत्या. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने मागील विश्वचषकात भारताच्या तीन खेळाडूंना तंबूत धाडले होते, त्याला याच सामन्यात सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते. जर भारताला यंदा या पराभवाची पुनरावृत्ती टाळायची असेल तर शाहीन आफ्रिदीच्या सुरुवातीच्या खेळीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे सचिन तेंडुलकरने सांगितले होते. यानुसार कर्णधार रोहित शर्मा व के. एल.राहुल यांना शाहीनच्या गोलंदाजीवर कसं टिकून राहायचं यावर सचिनने मार्गदर्शन केले होते.