मुंबई,दि.४: महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने अटक करत कारवाई केली आहे. दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक यांना दिलासा देण्यास पीएमएलए न्यायालयाने नकार दिला. या प्रकरणाची सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या न्यायालयीन कोठडीचा कालावधी १८ एप्रिलपर्यंत वाढवला. त्यामुळे नवाब मलिक यांना आणखी काही दिवस कोठडीत काढावे लागणार आहेत. या काळात नवाब मलिक यांना कोठडीत बिछाना, खुर्ची, घरचं जेवण आणि औषधे देण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.
नवाब मलिक यांनी गेल्याच आठवड्यात जामीन मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मलिक यांनी अटकेच्या कारवाईवरच आपल्या अर्जात आक्षेप नोंदवला आहे. माझी अटक पूर्णपणे बेकायदेशीर असून मला तत्त्काळ सोडले जावे, अशी विनंती मलिक यांनी आपल्या अर्जात केली आहे. हा अर्ज दाखल करून घेण्यात आला असला तरी त्यावरील सुनावणीची तारीख अद्याप निश्चित करण्यात झालेली नाही.
नवाब मलिक यांना ईडीने २३ फेब्रुवारी रोजी चौकशी करून अटक केली होती. सुरुवातीला काही दिवस नवाब मलिक ईडीच्या कोठडीत होते. त्यानंतर नवाब मलिक यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. या काळात नवाब मलिक यांच्याकडून जामीन मिळवण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. मात्र, उच्च न्यायालयानेही त्यांना जामीन नाकारला होता. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात तरी त्यांना दिलासा मिळणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.