नांदेड, दि.२५: Nawab Malik On Kirit Somaiya: राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. राजकारणात टीका करण्याचा स्तर घसरत आहे. नवाब मलिक यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे कथित भ्रष्टाचार उघड करणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे.
बातमी कशी होईल यासाठी किरीट सोमय्यांच प्रयत्न सुरूच असतात असे म्हणत मलिकांनी सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. “चित्रपट जशी चालवण्यासाठी आयटम गर्लची गरज लागते. मला वाटतं राजकीय क्षेत्रामध्ये किरीट सोमय्या भाजपाच्या आयटम गर्ल सारखे राजकारण करत आहेत. बातमी कशी होईल त्यासाठी आयटर्म गर्लचा कार्यक्रम सुरु आहे,” असे नवाब मलिक यांनी नांदेड येथे माध्यमांसोबत बोलताना म्हटले.
याआधी बोलताना किरीट सोमय्या यांनी मला नवाब मलिक यांना ‘गिफ्ट’ द्यायचंय असे म्हटले होते. “नवाब मलिक यांना मला काहीतरी भेट/बक्षीस (गिफ्ट) द्यायचं आहे. त्यांनी गेल्या महिन्यात असं काही सांगितलं की बीड जिल्ह्यात देवस्थानाची जमीन कुणाला तरी दिली गेली याची चौकशी करणार आहोत. खरं म्हणजे देवस्थानाची जमीन धनंजय मुंडे यांनी खाल्ली. पण आता रायगडमधील कर्जत येथे देवस्थानच्या जमिनीचे सातबारा माझ्या हातात आले आहेत. आज मी जाऊन ते कन्फर्म करणार आहे. तसेच या देवस्थानची जमीन या व्यक्तीकडे कशी गेली याची चौकशी झाली पाहिजे,” असे किरीट सोमय्या म्हणाले होते.
किरीट सोमय्या यांचे स्पष्टीकरण
नगरविकास खात्याच्या कार्यालयात किरीट सोमय्या यांनी फाईल तपासल्याने वाद निर्माण झाला होता.
किरीट सोमय्या यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मंत्रालयात जाऊन फाईल्स तपासताना मी कोणत्याही गोपनीयतेचा भंग केलेला नाही. दालनात जाऊन फाईल्स पाहण्यात काहीही गैर नाही. मी माहिती अधिकारातंर्गत या फाईल्स बघितल्या. मी घोटाळेबाज नेत्यांची माहिती घेतली, असे स्पष्टीकरण किरीट सोमय्या यांनी दिले. मी कोणाच्या फाईल्स पाहिल्या, याची भीती काँग्रेसला का वाटत आहे, असा सवालही किरीट सोमय्या यांनी विचारला होता. एवढेच नव्हे तर मी रवींद्र वायकर, प्रताप सरनाईक आणि अशोक चव्हाण यांच्या फाईल्स बघितल्या का, याची भीती वाटत आहे का? वेगवेगळ्या स्तरावरुन आम्हाला घोटाळ्यांची माहिती मिळत असते. उद्धव ठाकरे ते अशोक चव्हाणांपर्यंत सगळ्यांच्या घोटाळ्याची माहिती माझ्याकडे असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले.