दि.२५: यासिन मलिकच्या प्रकरणात माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी याने चिथावणीखोर ट्वीट केले आहे. दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याप्रकरणी काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासीन मलिक याला दिल्लीतील विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्याला द्यावयाच्या शिक्षेसंदर्भात युक्तिवाद २५ मे रोजी म्हणजेच आज न्यायालयात पार पडला आहे. बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये यासीन मलिकवर गुन्हे दाखल करून त्याच्यावर हा खटला चालविण्यात आला. आता दोन्ही पक्षाचा युक्तिवाद पार पडल्यानंतर यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
जम्मू काश्मीरचा फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या प्रकरणात पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी याने चिथावणीखोर ट्वीट केले. यासिन मलिक हा दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत करण्याच्या खटल्यात दोषी आढळल्यामुळे त्याला आज शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणी अफ्रिदीने ट्वीट केले. काश्मीरमधील मानवाधिकाराच्या उल्लंघना विरोधात आवाज उठवणाऱ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न भारताकडून सुरू आहे, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण अशा गोष्टींनी काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेला लढा थांबणार नाही, असं ट्वीट शाहिद आफ्रिदीने केलं.
“काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे हनन केले जात असून त्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, पण भारताने अशा लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्याने सुरूच ठेवला आहे. आता यासिन मलिक विरोधात खोटे आरोप करून त्याला गप्प केले जात आहे. पण असं असलं तरी काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेला लढा थांबणार नाही. काश्मीरी नेत्यांविरोधात चुकीच्या आणि बेकायदेशीर पद्धतीने केल्या जाणाऱ्या कारवायांची संयुक्त राष्ट्रांनी नोंद घ्यायला हवी”, असे ट्वीट शाहिद आफ्रिदीने केले.
आफ्रिदीच्या ट्वीटवर भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्राने रिप्लाय देत त्याची बोलती बंद केली. ‘प्रिय शाहिद आफ्रिदी, यासिन मलिकने कोर्टात गुन्हा कबूल केला आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या जन्मतारखेसारखी दिशाभूल करणारी (फसवी) असू शकत नाही’, असे उत्तर अमित मिश्राने दिले.