बांगलादेशात ब्रिटिश कालीन हिंदू पर्सनल लॉ आहे लागू

0

दि.20: बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याक आहेत. बांगलादेशातल्या (Bangladesh) कायद्यानुसार हिंदूंसाठी हिंदू कोड (Hindu Code in Bangladesh) लागू आहे. हिंदूंसाठीच्या त्या कायद्यात विवाहाच्या संदर्भाने अशा अनेक तरतुदी आहेत, की ज्याविरोधात हिंदूंनी अनेकदा जोरदार विरोध प्रदर्शित केला आहे. मात्र त्यात काहीही बदल झालेला नाही. तो असा कायदा आहे, की जो हिंदूंसाठी भारतातही आता लागू नाही.

भारतात विवाहित हिंदू महिलांना पुरुषांप्रमाणेच समान अधिकार देण्यात आले आहेत. त्यात संपत्ती, निर्वाह भत्ता, घटस्फोट (Divorce) आदी वेगवेगळ्या बाबींचा समावेश आहे. बांगलादेशात मात्र हिंदू पर्सनल लॉ (Hindu Personal Law) लागू असून, हिंदू कोडअंतर्गत इंग्रजांच्या कार्यकाळात जे कायदे लागू होते, त्यात महिलांना लाचारीच्या स्थितीत जीवन व्यतीत करावं लागतं.

बांगलादेशात 88 टक्के लोकसंख्या मुस्लिमांची असून, 10 टक्के लोकसंख्या हिंदूंची, तर 2 टक्के लोकसंख्या ख्रिश्चन, बौद्ध आणि अन्य धर्मीयांची आहे. 1971 साली जेव्हा बांगलादेशाची निर्मिती झाली, तेव्हा तिथे त्या देशाची घटना अंमलात आणण्यात आली. त्यानुसार, हिंदूंच्या कौटुंबिक बाबींसाठी ब्रिटिश कार्यकाळात लागू असलेले कायदेच लागू करण्यात आले.

दयाबाग संस्थेच्या हिंदूंसाठीच्या तरतुदींतर्गत बांगलादेशात हिंदू पर्सनल लॉ तयार करण्यात आला. पूर्वोत्तर भारतात स्वातंत्र्यापूर्वी या तरतुदींना मान्यता होती. या कायद्यानुसार बांगलादेशात राहणारा हिंदू पुरुष कितीही विवाह करू शकतो, मात्र विवाहानंतर त्याच्या पत्नीकडे संपत्तीपासून घटस्फोटापर्यंत कोणत्याच गोष्टीचे अधिकार असत नाहीत. विवाहानंतर पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये पवित्र बंधन तयार होतं, असं हिंदू धर्मात मानलं गेलं आहे. तसंच, विवाहानंतर स्त्री-पुरुष विभक्त होऊ शकत नाहीत, असंही मानलं गेलं आहे. ही बाब बांगलादेशात शब्दशः लागू करण्यात आली आहे.

हिंदू पर्सनल लॉअंतर्गत येणाऱ्या या तरतुदीला बांगलादेशातही बऱ्याच काळापासून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. या संदर्भात अनेक सर्वेक्षणंही केली गेली आहेत. अनेक संस्था याविरोधात आवाज उठवत आल्या आहेत, मात्र बांगलादेश सरकारने यात कधी बदल केला नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here