पुणे,दि.14: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. तुकोबारायांची शिळा ही भक्ती आणि आधाराचं केंद्र आहे. संत तुकाराम महाराज यांचे अभंग अनेक पिढ्यांचे मार्गदर्शक आहेत. संतांच्या कार्यातून नित्य ऊर्जा मिळत राहते. शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला येणे मिळणे हे माझे भाग्य असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देहूमध्ये शिळा लोकार्पण सोहळ्याच्य वेळी मांडल्या.
या सोहळ्यासाठी श्री क्षेत्र देहू येथे आज पंतप्रधान मोदी आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कार्यक्रमाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीच्या शक्तीचेच केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याला देखील प्रशस्त करते असे म्हटले. आषाढी वारीसाठी सोमवारी (20 जून) तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले.
मात्र या कार्यक्रमानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे. देहूतल्या मंदिर शिळा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधानांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाषण केलं. पण या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. यावरुन आता सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
महाराष्ट्राचा अपमान
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असल्याने त्यांना बोलू द्यावं अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली होती. पण पीएमओने त्याला काही उत्तर दिलं नाही. हे अतिशय वेदनादायी आणि अपमानकारक आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना न बोलू देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हे जे झालं ते अयोग्य आहे.”
खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, “प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवारांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं बंधनकारक आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. पण त्यांना बोलू दिलं नाही.”
नरेंद्र मोदींनी इशारा केला पण
अजित पवारांचे भाषण न झाल्याने पंतप्रधान मोदीही आश्चर्यचकित झाले. त्यांनी हाताने इशारा करुन याबाबत सूचना केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधानांचे नाव पुकारले. ही बाब लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावावं असं सांगितलं. पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही. तरीही नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांना भाषण करण्यास सांगितले, मात्र अजित पवारांनी मोदींनीच भाषण करावे असा आग्रह केला. त्यानंतर नरेंद्र मोदींचे भाषण झालं.