Omicron: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट बाबत ICMR चे वरिष्ठ शास्त्रज्ञ समीरन पांडा यांनी दिली महत्वाची माहिती

0

नवी दिल्ली,दि.28: दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा नवीन व्हेरिएंट (omicron) आढळल्याने अनेक देशात खळबळ माजली आहे. नव्या व्हेरिएंटमुळे (ओमिक्रॉन) चिंता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे, कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेली लस (Vaccine) या वेरियंटचा सामना करण्यासाठी प्रभावी ठरेल, अशीही चर्चा सुरू झाली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ समीरन पांडा यांनी याबाबत माहिती दिली. कोरोना व्हायरसच्या नवीन वेरियंटच्या जीन्स आणि संरचनेत बदल दिसून आले आहेत. या बदलांमुळे त्याची संसर्गजन्य क्षमता वाढेल की लसीचा प्रभाव कमी होईल? याची चाचपणी केली जात आहे, असे पांडा यांनी सांगितले.

कोरोनाचा नवीन वेरियंट आला असला तरी घाबरण्याचे काहीही कारण नाही. यापेक्षा नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घ्यावा आणि तो घेण्यात विलंब करू नये. तसंच कोरोनासंबंधी दिलेल्या मार्गदर्सक सूचनांचं पालन करावं, असे पांडा यांनी शनिवारी सांगितले.

व्हायरसच्या जिनोममध्ये झालेल्या अनेक बदलांमुळे त्याच्या स्पाइक प्रोटीनविरोधात तयार केलेल्या लसींनी रोगप्रतिकारशक्ती विकसित होऊ शकत नाही, असे डब्ल्यूएचओचे मत आहे. मोठ्या लोकसंख्येच्या पातळीवर या प्रकारचा व्हायरस कसा विकसित होतो हे शोधण्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. भारतात वापरल्या जाणार्‍या लसी – कोवॅक्सीन आणि कोविशील्ड या पूर्वी कोरोनाच्या इतर प्रकारांविरूद्ध प्रभावी असल्याचे आढळले आहे.

आता या लसी B.1.1.529 म्युटंट वेरियंटविरोधात प्रभावी ठरतील की नाही, वेळच सांगेल. कोरोना व्हायरसच्या नवीन वेरियंटमुळे जिनोम आणि संरचनेत इतर देशांमध्ये बदल दिसून आले आहेत. पण या बदलांमुळे त्याची संसर्गक्षमता वाढेल की लस निष्प्रभ होतील यावर संशोधन सुरू आहे, असे आयसीएमआरच्या संसर्गजन्य रोग आणि महामारीविज्ञान विभागाचे प्रमुख पांडा म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here