एकनाथ शिंदे आता भाजपाच्या जवळ कसे, हे फक्त ईडीचे डायरेक्टरच सांगू शकतात: विनायक राऊत

0

मुंबई,दि.२९: भाजपच्या विरोधात आवाज उठवणारे एकनाथ शिंदे आता भाजपच्या जवळ कसे गेले, हे फक्त ईडीचे डायरेक्टरच सांगू शकतात असे असा टोला शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी लगावला. काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेबाबत नवा दावा करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे.

यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले असून, शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी यावर भाष्य करत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. शिवसेना-भाजपची युती असताना भाजपकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याविरोधात सर्वांत आधी एकनाथ शिंदे यांनीच आवाज उठवला होता, असा दावा राऊत यांनी केला आहे.  

मुंबई प्रसारमाध्यमांशी बोलताना विनायक राऊत यांनी त्यावेळेचा घटनाक्रमच सांगितला. युती सरकारच्या काळात भाजपच्या त्रासाला कंटाळून सर्वप्रथम आवाज उठवणारे शिवसेनेतील मंत्री हे एकनाथ शिंदे हेच होते. पण आता ते भाजपच्या इतक्या जवळ कसे गेले, हे फक्त ईडीचे डायरेक्टरच सांगू शकतात, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला. 

एकनाथ शिंदे यांनीच भाजपची साथ सोडा, असा आग्रह धरला होता. त्यांच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही, असे म्हटले होते. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खूप आकांडतांडव घातले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढली होती. भाजपचा त्रास कसा असतो, हे उघडपणे सांगणारे तेव्हा एकनाथ शिंदे हेच होते, या शब्दांत विनायक राऊतांनी टीका केली. दुसरीकडे, एकनाथ शिंदे गटावरही विनायक राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड रामदास कदम यांनीच रुजवली. रामदास कदम जी काही बडबड करतात, त्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, नारायण राणे शिवसेना सोडून जात चालले होते, तेव्हा हेच रामदास कदम त्यांच्या बंगल्यावर चार दिवस मुक्कामी होते. नारायण राणे यांच्यासोबत राणे गटात या, असे शिवसैनिकांना सांगण्यात कदम आघाडीवर होते, असा मोठा आरोप विनायक राऊतांनी यावेळी केला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here