जिल्ह्यात घरोघरी मराठा व खुल्या प्रवर्गाचे होणार सर्वेक्षण: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

प्रत्येक तालुक्यात विशेष कक्षाची स्थापना

0

सोलापूर,दि.4: राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षणाच्या तयारीच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने प्रशासनाकडून जिल्ह्यात घरोघरी मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्याची तयारी सुरू केली असून, प्रत्येक तालुक्यात विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गावांत सर्वेक्षण करण्याची जबाबदारी ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, कृषी सहाय्यक व कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे  सर्वेक्षणाच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब  कांबळे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी रोहयो चारुशीला देशमुख जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गावसाने जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा जंलसंधारण अधिकारी  दामा, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी तसेच संबधित अन्य विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील सर्वेक्षणाच्या तयारीला जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मराठा समाजाचे मागासलेपण निश्चितीसाठी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक आधारावर निकष अंतिम केले आहेत. निकषांच्या आधारे राज्यातील मराठा समाजाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक कर्मचारी वर्ग पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सर्वेक्षणासाठी तयार करण्यात येणारे सॉफ्टवेअर ॲप्लीकेशन मोबाईलवरही वापरता येणार असल्याने सर्वेक्षणासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना युजर आयडी व पासवर्ड देण्यात येणार आहे. यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम,  कामाचे ठिकाण, तालुका, जिल्हा ही माहिती आयोगाच्या कार्यालयास द्यावयाची असल्याने माहिती प्राधान्याने संकलित करावी. या सर्वेक्षणासाठी 150 ते 200  कुटुंबांसाठी एक कर्मचारी या प्रमाणात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तालुक्यातील कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करताना नगरपालिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची ही माहिती संबंधित मुख्याधिकारी यांच्याकडून प्राप्त करून ती समाविष्ट करून एकत्रित माहिती पाठविण्याच्या सूचना प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी  दिल्या.

सर्वेक्षणासाठी जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी, तर  निवासी उपजिल्हाधिकारी सहायक नोडल अधिकारी तर प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलदार  नोडल अधिकारी, नायब तहसीदार  सहायक नोडल अधिकारी असतील. महापालिका स्तरावर महापालिका आयुक्त नोडल अधिकारी आणि महापालिका उपायुक्त सहायक नोडल अधिकारी त्याचबरोबर नगरपरिषद व नगरपंचायत वार्ड प्रभाग स्तरावर प्रभाग अधिकारी नोडल अधिकारी म्हणून असतील तर अन्य एक अधिकारी सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून कामकाजाची जबाबदारी असणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here