मुंबई,दि.17: Heat Stroke: नवी मुंबईतील खारघर (Kharghar) इथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या अनेकांना उष्माघाताचा (Heat Stroke) त्रास जाणवू लागला आणि त्यात अकरा जणांचा मृत्यू झाला. 19 जणांवर अद्यापही उपचार सुरु असून आठ जणांना उपचारांनंतर सोडून देण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) रात्री आठ वाजता आजारी श्री सदस्यांना भेटण्यासाठी कामोठेतील एमजीएम रुग्णालयात पोहोचले.
राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत | Heat Stroke
ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
अजित पवारांनी उद्धव ठाकरेंसह घेतली श्री सदस्यांची भेट
कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भेट घेतली. नागपूरमधील महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा संपवून रात्री 1.30 वाजताच्या सुमारास एमजीएम रुग्णालयात दाखल झाले. उद्धव ठाकरेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) देखील होते. या तीघांनी रुग्णालयातील श्रीसेवकांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर देखील टीका केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना लवकर निघायचं होतं म्हणून कार्यक्रम भर दुपारी ठेवला का, असा सवाल ठाकरेंनी केला. तर मृतांचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. उन्हाळा असताना भर दुपारी कार्यक्रम ठेवणं ही आयोजकांची चूक आहे. तसेच रुग्णांची आणि मृतांची संख्या उघड झाली नसल्याचंही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, खारघर येथील सोहळ्याची जय्यत तयारी महाराष्ट्र शासनाने केली होती. जवळपास 350 एकर जागेवर काही लाख श्री सदस्य मागील तीन दिवसांपासून या ठिकाणी राज्यातील विविध भागांतून दाखल झाले होते. या घटनेत जवळपास 350 पेक्षा जास्त जणांना वेगवगेळ्या ठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यापैकी काहींना प्राथमिक उपचार देऊन सोडण्यात आले आहे.
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. परंतु या कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात अकरा जणांचा मृत्यू झाला.