नवी दिल्ली,दि.27: Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी आज होणार आहे. याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेने (Shivsena) 16 आमदारांवर कारवाई करण्याची मागणी तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्याकडे केली होती. शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईबाबत उत्तर देण्यासाठी आमदारांना 48 तासांची मुदत देण्यात आली होती. मात्र यानंतर सुप्रीम कोर्टात तत्कालीन ठाकरे सरकारला बंडखोर आमदारांवर कारवाई करू नये म्हणून एकनाथ शिंदे गटाने याचिका दाखल केली होती.
एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात उद्भवलेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे एकत्रित सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी करून स्थापन केलेल्या सरकारचे भवितव्य या याचिकांच्या निकालावर अवलंबून आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांमार्फत 7 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीच्यावेळी निवडणूक चिन्हाच्या मुद्यावर भर दिला होता. या मुद्यावर निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली होती. हाच मुद्या निवडणूक आयोगाच्या वकिलांनीसुद्धा उपस्थित केला होता. या मुद्यावर घटनापीठ काय निर्णय घेणार, हे सुनावणीच्या वेळी स्पष्ट होणार आहे. खरी शिवसेना कुणाची हा मुद्दा महत्त्वाचा असल्याने निवडणूक चिन्हाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. अलिकडेच निर्णय झाल्याने या महत्त्वाच्या खटल्याचे लाइव्ह स्ट्रिमिंगही करण्यात येणार आहे.
दरम्यान, जनतेला सत्तासंघर्षाची सुनावणी लाईव्ह पाहता येणं शक्य होणार आहे. आजपासून सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. घटनापीठाच्या सुनावण्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचा निर्णय न्यायालयाच्या बैठकीत घेण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचं थेट प्रक्षेपण करण्यात यावं, याबाबत याचिका दाखल केल्यानंतर सुमारे चार वर्षांनी हा निर्णय घेण्यात आला. या लिंकवर : https://webcast.gov.in/scindia/ थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
महाराष्ट्राचं प्रकरण कोर्टात कामकाजात समावेश केला आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. 27 तारखेला सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राचे प्रकरण दुसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणूक आयोगाची कार्यवाही चालू ठेवायची की नाही याबाबत सुरुवातीला फैसला अपेक्षित आहे. 7 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश दिले होते. त्यामुळे 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट महत्त्वाचे आदेश देण्याची शक्यता आहे.








