सोलापूर महापालिकेत भाजपची ‘बिनविरोध’ हॅट्ट्रिक! रंजिता चाकोते स्थायी समितीच्या सभापतीपदी

0

सोलापूर,दि.६: तब्बल आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोलापूर महानगरपालिकेत ‘स्थायी समिती’चे पुनरुज्जीवन होत असून, भारतीय जनता पक्षाच्या रंजिता चाकोते यांची सभापतीपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. आज (शुक्रवारी) सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात होणाऱ्या बैठकीत या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब केले जाईल.

• बिनविरोध निवड: विरोधी पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने चाकोते यांचा एकमेव अर्ज दाखल.

• ऐतिहासिक नोंद: सोलापूर महापालिकेच्या इतिहासातील ४९ व्या सभापती आणि सहाव्या महिला सभापती ठरण्याचा मान.

• भाजपचा दबदबा: महापौर, उपमहापौर आणि आता स्थायी समिती सभापती; तिन्ही महत्त्वाच्या पदांवर बिनविरोध निवडीची हॅट्ट्रिक.

• प्रशासकीय राजवटीला पूर्णविराम: ४ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पुन्हा लोकशाही प्रक्रिया सुरू.

इतिहासाच्या पानावर रंजिता चाकोते!

महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत ४८ सभापती झाले आहेत. रंजिता चाकोते या ४९ व्या सभापती असतील. विशेष म्हणजे, त्या महापालिकेच्या इतिहासातील सहाव्या महिला सभापती ठरतील. यापूर्वी प्रभावती मसरे, शिवलिंगम्मा आसादे, प्रा. मोहिनी पतकी, विजया थोबडे आणि हणमंती करगुळे यांनी हे पद भूषवले आहे. भाजपच्या त्या दुसऱ्या महिला सभापती, तर बिनविरोध निवडून येणाऱ्या पहिल्या महिला सभापती म्हणून त्यांची नोंद होईल.

विरोधी पक्ष निष्प्रभ

१६ सदस्य असलेल्या स्थायी समितीमध्ये भाजपचे स्पष्ट वर्चस्व (१४ सदस्य) आहे. शिवसेना आणि एमआयएमचा प्रत्येकी एक सदस्य असला, तरी अर्जासाठी आवश्यक असणारे ‘सूचक’ आणि ‘अनुमोदक’ मिळवणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे रंजिता चाकोते यांचा मार्ग मोकळा झाला. अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश निराळी हे या निवडणूक प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

८ वर्षांचा वनवास संपला

२०१७ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सभापती निवडीवरून झालेल्या वादामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतर ४ वर्षे स्थायी समिती अस्तित्वात नव्हती आणि २०२२ पासून महापालिकेत प्रशासक राजवट होती. आता ८ वर्षांनंतर पुन्हा एकदा स्थायी समिती सक्रिय होणार असल्याने शहराच्या विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here