Gyanvapi Mosque: सर्वोच्च न्यायालयाकडून ज्ञानवापीमधील सर्वेक्षणावर स्थगिती

0

नवी दिल्ली,दि.24: Gyanvapi Mosque: वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने 26 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. यासोबतच परिसरात दोन आठवडे कोणत्याही प्रकारचे खोदकाम करू नये, असं देखील सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे. ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्थापनावर (Gyanvapi Masjid Case) देखरेख करणाऱ्या अंजुमन समितीने (Anjuman Committee) सर्व्हेविरोधात याचिका दाखल केली होती. काशी विश्वनाथ मंदिराशेजारील मशीद परिसराचं सर्वेक्षण करण्याच्या वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

Gyanvapi Mosque: सर्वोच्च न्यायालयाकडून ज्ञानवापीमधील सर्वेक्षणावर स्थगिती

सोमवारी (24 जुलै) वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार एएसआयचं पथक सर्वेक्षणासाठी मशिदीच्या परिसरात पोहोचलं होतं. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सर्वेक्षण पथकाला सकाळी 11.15 वाजता कोर्टात हजर राहून सर्वेक्षणाची माहिती देण्यास सांगितली होती. याच दरम्यान, सुप्रीम कोर्टाने ज्ञानवापी मशिदीतील सर्व्हेला 26 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे.

अंजुमन समितीतर्फे वरिष्ठ वकील हुजैफा अहमदी खंडपीठात बाजू मांडत आहेत. शुक्रवारी सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले असून, आम्हाला अपील करण्याची संधी मिळाली नाही आणि त्याआधीच सर्वेक्षण सुरू झाल्याचं अंजुमन समितीकडून सांगण्यात आलं. खोदकामासंदर्भातील आदेश असल्यास आम्हाला दाद मागण्याची संधी मिळावी, असं अहमदी म्हणाले होते.

सर्वेक्षणादरम्यान खोदकाम होणार आहे का? असा प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारला असता, यूपी सरकारचे वकील तुषार मेहता यांनी सांगितलं की सर्वेक्षण हे आधुनिक तंत्रज्ञानाने केलं जाईल. यामध्ये कोणतंही नुकसान होणार नाही. हिंदू पक्षातर्फे ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनीही सर्वेक्षणात कोणतंही खोदकाम होणार नसल्याचं सांगितलं होतं.

अंजुमन समितीचे वकील अहमदी यांनी खंडपीठाला सांगितलं की, आम्ही सर्वेक्षणासाठी दोन-तीन वेळा स्थगिती देण्याची विनंती केली होती, मात्र तरीही सर्वेक्षणाला स्थगिती देण्यात आली नव्हती. वैज्ञानिक सर्वेक्षणाची वेळ अद्याप आलेली नाही, असं आम्ही मानतो आणि पहिलं हे प्रकरण गुणवत्तेवर पाहिलं पाहिजे, असं अहमदी म्हणाले. तर, पश्चिमेकडील भिंतीवर खोदकाम केलं जात असल्याचंही ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here